22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरसोलापुरात आयकरच्या धाडी

सोलापुरात आयकरच्या धाडी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज गुरुवारी सकाळी ७ पासून आयकर विभागाचे धाडसत्र सुरु होते. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, रुग्णालयांची आयकर विभागाच्या वतीने चौकशी सुरू आहे, तर पंढरपूर येथील खासगी साखर कारखान्याचे चालक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखाने आणि उद्योगावरही धाडी टाकण्यात आल्या. याबाबत आयकर विभागाच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, शहरात जवळपास ७ ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्शन या ठिकाणी सकाळपासून झडती सुरू होती. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहुल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकारी करत आहेत. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल आणि कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी ग्रामीण रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणीदेखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले. सोलापुरातील आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे बिपीनभाई पटेल यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, यासंदर्भात आयकर विभाग किंवा पटेल यांच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

याशिवाय कोरोना काळात प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयांत आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. सोलापुरातील २ प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या रुग्णालयातदेखील आज सकाळी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोलापुरातील ७ रस्ता परिसरात असलेल्या डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट क्लिनिक येथे आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ अनुपम शहा यांच्या हॉस्पिटलवरदेखील आयकर विभागाने छापा टाकला आहे.

जवळपास २४ पथकांद्वारे विविध ठिकाणी छापे
आज महाराष्ट्रातील विविध भागात सुरू असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिका-यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबिराचे पोस्टर लावण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास २४ पथकांद्वारे विविध ठिकाणी कारवाया सुरू आहेत. यामध्ये ५० गाड्या आणि शंभरहून अधिक पोलिस कर्मचा-यांचा समावेश आहे.

अभिजित पाटील यांच्या चार कारखान्यांवर धाडी
आयकर विभागाने पंढरपूरमधील अभिजीत पाटील यांच्याशी संबंधित ४ साखर कारखान्यांवरही धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर, पंढरपूरपाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखाना, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरातील वसंतदादा साखर कारखान्याचा समावेश आहे. हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अभिजित पाटील यांचेच पॅनल निवडून आले. अशा स्थितीत त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

सोलापुरात या ठिकाणी धाडी
-मेहुल कन्स्ट्रक्शन
-अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर
-अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी
-बिपीन पटेल यांच्या घरी
-डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल
-डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक
-डॉ. विजयकुमार रघोजी यांचे रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या