सोलापूर : एकट्या पश्चिम महाराष्ट्रात ७ लाख लीटर दूध संकलनाचा टप्पा ओलांडलेल्या गुजरातच्या अमूल दूध संघाने दूध खरेदी दरात उडी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातून दुधाची खरेदी करणाऱ्या साबरकंठा जिल्हा दूध संघाने गाय दुधाचा खरेदी दर ३८ रुपये २६ पैसे दर केला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघापुढे पेच निर्माण झाला आहे . म्हैस दूध खरेदी दरातही वाढ केली आहे.
सध्या देशभरात दुधाची टंचाई आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पावडर, बटर व इतर पदार्थाच्या किमती वाढल्या आहेत. पावडर व . बटरचे दर वाढल्याने दूध खरेदी दरातही वाढ होत आहे. राज्यातील आघाडीच्या सोनाई दूध संघाने २१ जानेवारीपासून गाय दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ केली आहे. सोनाईने गाय दूध खरेदी दर प्रति लीटर ३७ रुपये केल्यानंतर सोलापूर जिल्हा संघानेही दूध उत्पादकांना दरवाढ केली आहे. आता इतर दूध संघांनाही शेतकऱ्यांना दरवाढ द्यावी लागणार आहे असे असतानाच गुजरातमधील अमूल अखत्यारित साबरकंठा जिल्हा दूध संघाने गाय दूध खरेदीला प्रति लीटर ३८ रुपये ९६ पैसे दराचे दरपत्रक काढले आहे.
गुजरातमध्ये अमूल डेअरी संचलित जिल्हा दूध संघ कार्यरत आहेत. तेथील जिल्हा दूध संघांनी महाराष्ट्रातील जिल्हे दूध संकलनासाठी वाढून घेतले आहेत. पुणे व सातारा जिल्ह्यातील दुधाची खरेदी करा (खेडा) जिल्हा दूध संघ, सोलापूर जिल्ह्यात साबरकांठा जिल्हा संघ, कोल्हापूर जिल्ह्यात सुमूल (सूरत जिल्हा दूध संघ तसेच सांगली व अहमदनगर जिल्ह्यातील दुधाची खरेदी पंचमहल गोधरा जिल्हा दूध संघ करीत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून दररोज सव्वा ते दीड लाख लीटर दूध संकलन होत असल्याचे सांगण्यात आले. साबरकंठा जिल्हा दूध संघ म्हैस ६.०:९.० दुधाला प्रति लीटर ४८ रुपये ६० पैसे व गाय ३.५:८.५ दुधाला प्रति लीटर ३८ रुपये २६ पैसे दर देणार आहे.
गाय व म्हैस दूध खरेदीदरात २५ जानेवारीपासून वाढ केली आहे. गाय दुधाला दूध उत्पादकांना प्रति लीटरला ३९ ते ४५ रुपये दर मिळणार आहे. म्हैस दुधाला प्रति लीटरला ४१ ते ८१ रुपये दर मिळेल. ६.० फॅटला ४८ रुपये ६० पैसे दर पडेल. साबरकांठा जिल्हा दूध संघ सोलापूर, नांदेड, बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील दुधाची खरेदी करतो.असे साबरकता मिल्क प्रोड्युसर यूनियन लि. हिम्मतनगर गुजरातचे अधीक्षक, डॉ. राजेश दाभाडे यांनी सांगीतले.