अकलूज : गेल्या पाच महिन्यांपासून चीन मध्ये अडकलेल्या २३ भारतीय अधिकारी व कर्मचा-यांना दिलासा मिळाला असून ते येत्या आठ दिवसात मायदेशी परततील असा विश्वास आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी या मुंबई येथील भारतीय मर्चट नेव्ही कंपनीचे जहाज ऑस्ट्रेलिया येथून कोळसा सप्लाय करण्यासाठी चीन देशातील बंदरापाशी गेल्यानंतर चीन सरकारने कोळसा स्विकारण्यास नकार दिला होता . त्यामुळे तब्बल गेल्या ५ महिन्यांपासून हे जहाज व या जहाजावर कार्यरत असलेले भारतातील २३ अधिकारी व कर्मचारी अडकून पडलेले होते.
यात पंढरपूरचे सुपूत्र वीरेंद्रसिंह भोसले हे देखील होते . त्यांच्या जवळचा औषध – गोळ्यांचा साठा संपत आलेला असल्याने अधिकारी व कर्मचा-यांची मानसिकता देखील ढासळत चाललेली होती . या सर्वांची सुटका करण्यासाठी वीरशैव सभेचे पंढरपूर शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन देवून या सर्व अधिकारी व कर्मचा-यांची सोडवणूक करावी अशी विनंती केली होती.
आ. रणजितंिसह मोहिते पाटील यांनी जी२०, जी७ चे शेरफा सुरेश प्रभू यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. यावर तात्काळ सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क साधत सूत्रे हलविली होती.
आज जी२०,जी७ चे शेरफा सुरेश प्रभू यांचे आ मोहिते पाटील यांना पत्र आले . यामध्ये चीन दुतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे . २३ भारतीय अधिकारी व कर्मचारी यांची येत्या आठवडाभरात पाठवण केली जाणार असून ते आठवडाभरात मायदेशी परततील असे आ. रणजितंिसह मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.