22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeसोलापूरचौकशी समित्यांचे डिसले गुरूजींच्या कामकाजावर आक्षेप

चौकशी समित्यांचे डिसले गुरूजींच्या कामकाजावर आक्षेप

एकमत ऑनलाईन

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर आणि विज्ञान केंद्र, सिंहगड इन्स्टिट्यूट येथे नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०२० या काळात प्रतिनियुक्ती असतानाही डिसले तिकडे फिरकलेच नाहीत. केवळ एक दिवस ते डायटकडे हजर राहिले. असे असतानाही त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्याध्यापकाचा युजर आयडी व पासवर्ड वापरून वेतन काढल्याची बाब समोर आली आहे.

जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी क्यूआर कोड शिक्षण प्रणाली विकसित करणाऱ्या डिसलेंना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला. पण, त्यासाठी त्यांनी दिलेली माहिती वस्तुनिष्ठ नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाली. तत्पूर्वी, तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी त्यावेळचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून डिसले गुरुजींची तीन वर्षांच्या काळातील हजेरीची चौकशी केली.

त्या समितीचा अहवाल त्रोटक असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची चौकशी समिती नेमली. त्या समितीने डिसले गुरुजींची ज्या ज्या ठिकाणी प्रतिनियुक्ती होती, त्या ठिकाणी भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची शहानिशा केली. त्याचवेळी डिसले गुरुजींनी ४८५ पानांचा खुलासा दिला. त्यात त्यांनी जवळपास दोनशे पाने फोटो जोडले. विशेष म्हणजे त्या फोटोंवर तारीख नाही, कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. डिसले गुरुजींनी आपण विज्ञान केंद्रात व सिंहगड इन्स्टिट्यूट येथे उपस्थित होतो, असेही खुलाशातून सांगितले. पण, जावीर यांच्या चौकशी समितीला ते त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे.

चौकशी समितीचे निष्कर्ष
डायटवर प्रतिनियुक्ती झाल्यानंतरही डिसलेंनी स्वत:कडेच ठेवले शाळेचे आर्थिक व्यवहार ७ नोव्हेंबर २०१४ ते २ जानेवारी २०२० रोकड किर्दीवर व्यवहारानंतर शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वाक्षऱ्या नाहीत. डायटकडून मासिक उपस्थिती अहवाल न घेताच परस्पर काढले स्वत:चे वेतन. १७ नोव्हेंबर २०१७ ते २ जानेवारी २०२० या काळातील आर्थिक व्यवहारात अनियमितता.
शाळा व्यवस्थापन समितीच्या ठराव व मंजुरीशिवाय केला मनमानी खर्च.
१३ नोव्हेंबर २०१७ ते ४ फेब्रुवारी २०१८ या काळात अनधिकृतपणे राहिले गैरहजर.
नोव्हेंबर २०१७ ते जून २०१८ या काळात विज्ञान केंद्रात काम केल्याचा खुलासा, पण त्या ठिकाणी असल्याचा पुरावाच नाही. झेडपी व विज्ञान केंद्रातील सामंजस्य करारानुसार हा उपक्रम जिल्ह्यातील झेडपी शाळांमधील मुलांसाठी होता, तरीही त्याचा वापर परस्पर बाहेरील देशातील तथा झेडपी शाळांमधील मुलांसाठी करून नियमभंग केला.

दोन्ही चौकशी समित्यांनी डिसले गुरुजींच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत त्यांना दोषी धरलेले असतानाही त्यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी त्रास दिल्याचा आरोप केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या