सोलापूर : पेपरलेस कोर्ट चालवण्यासाठी ई फायलिंग प्रक्रिया करण्यात येत आहे. सध्या या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्याला आता दोन वेळा मुदतवाढ मिळाली आहे. सध्या ही प्रक्रिया किचकट असल्याच्या तक्रारी वाढत आहेत, पण त्यातच शहरातील ई फायलिंगद्वारे जामिनासाठी केलेल्या अर्जाला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, सोलापुरातील अॅड. पांढरे यांनी दिवाणी, फौजदारी आणि क्रिमिनल अर्ज ई फायलिंगद्वारे केले. शिवाय त्यांनी नुकतेच कौटुंबिक हिंसाचार कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या महिलेच्या जामिनीसाठीही ई फायलिंगद्वारे अर्ज केला. जिल्हा न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी आरोपीला अंतरिम जामीन मंजूर केला.
ई-फायलिंगचा प्रारंभ झाल्याने वेळ आणि खर्च यांची बचत होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ९ जानेवारी २०२३ पासून ई फायलिंग अनिवार्य करण्यात आले आहे; पण वकिलांच्या व ग्रामीण भागातील इंटरनेटची सुविधा आदी कारणांमुळे १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. हा जिल्ह्यातील पहिला ई जामीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
वैधानिक कागदपत्रांचे इलेक्ट्रॉनिक् फायलिंग करण्याकरिता ई-फायलिंग पद्धती उपयोगात आणण्यात येत आहे उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये यांनी ई-फायलिंग प्रणाली सुरू केली आहे.