साड्या, ज्वेलरी, पैठणी अशा विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री किर्ती कलेक्शन फर्मच्या माध्यमातून किर्ती देशपांडे करतात. त्यांचे शिक्षण बी.कॉम. इतके झाले असून दहा ते बारा वर्षे त्यांनी घरी विद्यार्थ्यांना शिकवण्या घेतल्या. त्याबरोबरच पिको फॉलचे कामही त्या करित होत्या. त्यांचे पती रिक्षा चालक होते. त्यामुळे संसाराला हातभार लावण्यासाठी किर्ती देशपांडे यांनी विविध व्यवसाय केले.
आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांबरोबर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आदी शहरात त्यांचा ग्राहक वर्ग विस्तारला आहे. ऑनलाईन व्यवसायाचे कोणतेही ज्ञान नसताना त्यांनी मुलगी मृदुला हिच्या मदतीने ऑनलाईन डिजिटल व्यवहार शिकून घेतले. आणि यशस्वीपणे त्यांनी ऑनलाईन व्यवसायात यश मिळवले. त्यांची मुलगी मृदुला एम.एस.ई. करीत असून व्यवसाय वाढवणे हेच त्यांचे ध्येय असल्याचे त्या सांगतात. माफक नफा आणि दर्जाकडे लक्ष दिल्याने व्यवसायात ग्राहकांचा विश्वास जिंकता आल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात ओल्या हळदीचा व्यापारही त्यांनी ऑनलाईन मार्केटिंग पद्धतीने केला. याबरोबर अनेक उत्पादनांना त्यांनी बाजारपेठ मिळवून दिली आहे.
संसाराला हातभार लावण्यासाठी व्यवसायात
पती धनेश देशपांडे हे रिक्षा व्यवसाय करत होते. त्यामुळे संसारिक जबाबदा-या पार पाडण्यासाठी पतीला हातभार लागावा या हेतूने किर्ती देशपांडे यांनी सातत्त्याने विविध व्यवसाय केले.
नोकरी न करता व्यवसायालाच प्राधान्य
प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करताना व्यवसाय करणे हेच ध्येय ठेवून शिकवण्या, पिकोफॉल, ऑनलाईन ट्रेडिंग अशा व्यवसायांमध्ये किर्ती देशपांडे यांनी यश मिळवले. नोकरीपेक्षा व्यवसायाला त्यांनी प्राधान्य दिले.
परस्थितीपुढे न खचता घेतली भरारी
कर्करोगाशी झुंज देता देता किर्ती देशपांडे यांच्या पतीचेही काही काळापूर्वी निधन झाले. मात्र त्यानंतरही न खचता त्यांनी संसाराची जबाबदारी पेलत व्यवसायाची घडीही उत्तमरित्या बसवली आहे.