36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeसोलापूर‘नमामि चंद्रभागा’ अंतर्गत कृतिसंगम अभियान राबवणार

‘नमामि चंद्रभागा’ अंतर्गत कृतिसंगम अभियान राबवणार

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
‘नमामि चंद्रभागा’ अंतर्गत भीमा नदीचे प्रदूषण रोखणे, नदीकाठची शेती सेंद्रिय करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागच्या वतीने कृतिसंगम अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. भीमा नदी वाहणा-या जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात अभियानची सुरुवात होईल.
जिल्हा परिषदेत भीमा नदीकाठच्या गावात प्रदूषण रोखणेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तसेच कृषी विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नमामि चंद्रभागा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नदीकाठच्या शेतीमध्ये होणा-या रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पशुपालन करणा-या शेतक-यांच्या पशूंच्या मल-मूत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी गांडुळखत प्रकल्प, स्लरी, तसेच कच-यापासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅस, गोबरधन बाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करण्यात येईल, असेही सीईओ स्वामी यांनी सांगितले. नदीकाठच्या गावातील पशुपालक नदीपात्रात जनावरे धुतात. त्यासाठी दुसरी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. नदीपात्राच्या बाजूने स्थानिक प्रजातीची रोपे लावून जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत कृती धोरण निश्चित करण्यात आले.

नदीकाठावरील गावामध्ये शेतकरी मेळावे घेऊन त्यांना घनकचरा व्यवस्थापन व सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणेत येईल. २० मे नंतर पंढरपूर व माळशिरस तालुक्यात शेतकरी मेळावे होतील. नदीकाठच्या १३१ ग्रामपंचायतींचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आहे. याचे व्यवस्थापन झाल्यास नदीचे प्रदूषण रोखण्यात मदत होईल. लोकसंख्येच्या प्रमाणात या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून भीमा नदी वाहते. सुरुवातीला पायलट म्हणून दहा गावांत ही मोहीम हाती घेण्यात येत आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील नमामि चंद्रभागा अंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये याची सुरुवात होईल.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या