पंढरपूर / प्रतिनिधी (अपराजित सर्वगोड)
भूवैकुंठ पंढरीनगरीत आज विठ्ठल भक्तांच्या साक्षीने माघ वारी सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल झाल्याने विठुनामाच्या जयघोषाने आणि टाळमृदंगाच्या गजराने पंढरी नगरी भक्तिमय झाली आहे. माघ वारी निमित्त बुधवारी पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा मंदिर समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या चरण दर्शनासाठी भाविकांना सुमारे बारा तास लागत असून मुखदर्शनास तीन ते चार तास लागत आहेत. भगवान श्री विठ्ठलाच्या चार प्रमुख वारी सोहळ्यांपैकी एक असणारा माघ वारी सोहळा पंढरीत साजरा होत आहे.
पंढरीत येणा-या भाविकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पंढरीत येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पायी चालत येणा-या भाविकांना विशेष सूचना देऊन अपघात मुक्त वारी करण्याचा संकल्प पोलीस प्रशासनाने केला आहे. येणा-या भाविकांच्या सेवेसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती प्रशासन, पंढरपूर नगरपरिषद प्रशासन तसेच तालुका महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. माघवारी सोहळ्यासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरीत दाखल झालेल्या ंिदड्या व पालख्यांसाठी ६५ एकर परिसरात राहण्याची सोय करण्यात आली आहे. पंढरीत येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीकडून वेदांत, व्हिडिओकॉन, एमटीडीसी तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे निवासाची सोय करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन बारी, ६५ एकर परिसर तसेच शहरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत भाविकांना त्रास होऊ नये याकरिता गोपाळपूर रोड वरील वैकुंठ स्मशानभूमी जवळ सहा पत्राशेड उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी २४ तास शुद्ध पाणीपुरवठा, मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत भाविकांना पदोपदी श्रीविठ्ठलाचे दर्शन व्हावे याकरिता मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत एलईडी स्क्रीनची सोय याचबरोबर भक्ती गीते ऐकण्यासाठी स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद जलद उपलब्ध व्हावा याकरिता लाडू प्रसाद विक्रीचे स्टॉल. नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नदीतीरावर बोटी तसेच लाईफ गार्ड्स तैनात केले आहेत. पंढरपूर शहरात यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता शहरातील विविध ठिकाणी माहिती कक्ष उभारण्यात आले आहेत.