पंढरपूरः स्टेशन रोडवर नव्याने सुरू झालेल्या कॉटन एक्स्पो मॉलला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ६० लाखांहून अधिक किमतीच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी नगरपालिकेच्या दोन अग्निशामक वाहनांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान दुकानातील एक कर्मचारी जखमी झाला.
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चालक आणि त्यातील कर्मचारी जेवण आटोपून नमाज अदा करण्यासाठी दुकान बंद करून गेले होते. त्याचवेळी दुकानात आग लागली. दुकानातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले तशी सर्वत्र पळापळ सुरू झाली. दुकान उघडून विझवण्याचा प्रयत्न सुरू होईपर्यंत अर्ध्याहून अधिक माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आग लागलेल्या दुकानाचा परिसर नेहमी गर्दीचा परिसर आहे. या परिसरात इतरही दुकाने, हॉटेल्स आहेत. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेने वेगाने प्रयत्न केले. अर्धातासा नंतर आग विझवण्यात यश आले. मात्र ५० ते ६० लाखांचे नुकसान झाले.
आषाढी यात्रा तोंडावर आली असल्याने दुकानात नुकताच माल भरून ठेवला आग होता. ८० ते ७५ लाख रुपयाचा माल होता अशी प्राथमिक माहिती आहे. शिवाय दोन दिवस विक्री झालेल्या मालाची रक्कमही मॉल मध्येच होती. त्यामुळे या आगीत जवळपास ५० ते ६० लाख रुपयांचे कपडे, चपला, इमिटेशन ज्वेलरी, गृह उपयोगी वस्तू, खेळणी जाळून खाक झाल्या.