22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसोलापूरगढूळ पाण्यामुळे वैतागलेल्या महिलांचा मनपात राडा

गढूळ पाण्यामुळे वैतागलेल्या महिलांचा मनपात राडा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अक्कलकोट रोड येथील संगमेश्वर नगरात गेली अनेक दिवस नळातून ड्रेनेजचे पाणी येत आहे. घरात ड्रेनेजचे पाणी शिरत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला शुक्रवारी सायंकाळी आयुक्त कार्यालयावर धडकल्या. मनपा आयुक्तांनी ड्रेनेज विभागातील अधिका-यांना झापले आणि तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून संगमेश्वरनगर आणि परिसरात ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम करण्यात आले. हे काम अर्धवट राहिले. गेली अनेक दिवस नळांना गटारीचे पाणी येत आहे. या भागातील नागरिकांनी झोन कार्यालयात तक्रारी केल्या. तरीही नळाला ड्रेनेजचे पाणी आल्यामुळे संतप्त महिला शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत आल्या.

आम्ही गोरगरीब माणसे, नळाला घाण पाणी येते. जारचे पाणी विकत घ्यायची परिस्थिती नाही. जोपर्यंत काम करण्याचे आदेश देत नाहीत तोपर्यंत इथेच बसू राहू असा इशारा दिला. महिलांचा गोंधळ ऐकून आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी यांना बोलावून घेतले.

पालिकेने दास ऑफशोअर कंपनीच्या माध्यमातून हदवाढ भागात सुरु केलेले ड्रेनेज लाइनचे काम ठप्प आहे. या कंपनीला काळया यादीत टाकण्याची नोटीस आयुक्तांनी मार्च महिन्यात दिली होती. लवकरच काम करू असे सांगून दोन महिने झाले तरी कामाला सुरुवात नाही. प्रशासन हतबल झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले.

नगरसेवक नागेश वल्याळ यांनी या महिलांची आयुक्तांसोबत भेट घडवून दिली. संगमेश्वरनगर भागातील अभियंता बक्षी यांना आयुक्तांनी फोनवरून झापले. दोन दिवसांत ड्रेनेज लाइनची दुरुस्ती करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करू असा इशारा दिला. यावेळी सलीम नमाजी, एजाज बागवान, हैदर नदाफ, हकीम मुजावर, शारदा गाडेकर, नवनाथ शिंदे, सुमन लोंढे, सिद्धप्पा रामपुरे, मीनाक्षी कल्याणीवाले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या