सोलापूर : मॅक्स क्रिप्टो घोटाळ्यात किरण मंगलपल्ली आत्महत्या प्रकरणी टेक्स्टाईल उद्योजक पुलगम यांच्यासह १९ जणांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी किरणची पत्नी सुमलता मंगलपल्ली (वय ३५, रा. न्यू पाच्छा पेठ, साईबाबा चौक) यांनी फिर्याद दिली आहे.
मॅक्स क्रिप्टो अॅपद्वारे दामदुप्पट डॉलर योजनांचे आमिष दाखवल्यानंतर अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली. मॅक्स क्रिप्टो अॅपचा व्यवहार किरण मंगलपल्ली हा बघायचा. अॅप अचानक बंद पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी किरणच्या मागे पैशांसाठी तगादा लावला, असे किरणने त्याच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले असून, नोटमधील े माहितीची पोलिस तपास करत आहेत.
पूर्वभागातील टेक्स्टाईल उद्योजक नित्यानंद पुलगम, नीलेश वाघमोडे, गिरीश चिप्पा, तुषार चिप्पा, अन्दर छुरी, श्रीकांत बसाटे, विगेश्वर कॉपेल्ली, पोशेट्टी येमुल कृष्णा आडम, श्रीनिवास मिसालोलू, प्रवीण चिप्पा, अमर मोठे, विशाल मिठ्ठा, राहुल कुरापाटी, विनोद कामुनी, ऋषी महेश्वरम, अमर एक्कलदेवी, मोतीलाल गुंगाळ, गणेश आडम (सर्व रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
किरण मंगलपल्ली याने सांगलीच्या लॉजवर १० डिसेंबर रोजी विष घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या लॉजवर एक सुसाइड नोट सापडली. १९ जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाइड नोटमध्ये आहे.
किरण याची पत्नी सुमलता मंगलपल्ली यांनी १९ जणांवर कारवाई करण्याची मागणी जेलरोड पोलिसांकडे केली. तशी फिर्याद त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. तक्रारीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. मॅक्स किष्टोमध्ये अनेकांनी गुंतवणूक केली आहे. अँप बंद पडल्यानंतर अनेकांचे लाखो रुपये बुडाले. अॅपचा व्यवहार पाहणारा किरण यात अडकला. मॅक्सचा निर्माता मात्र कुठेच समोर आला नाही. अँपचा निर्माता कोण, अॅपचे व्यवहार कुठून चालायचे, हा अँप सोलापुरात कसा आला, यात अनेकजण कसे अडकले, याचा शोध घेणे गरजेचे आहे. यातील काही गुंतवणूकदार वारंवार दुबईचे दौरे करायचे. तेथील कार्यक्रमांना हजेरी लावायचे. त्यामुळे मॅक्स क्रिप्टोचे धागेदोर तपासणे गरजेचे बनले आहे.