सोलापूर : तू दरिद्री आहेस. जर तुला नांदायचे असेल तर माहेरून जिमसाठी ३० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सुनेचा छळ केल्याप्रकरणी पद्मिनी निखिल कोंडा (वय २७, रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड) यांच्या फिर्यादीवरून तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पद्मिनी कोंडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी पती निखिल श्रीनिवास कोंडा हा परस्त्रीशी बोलत होता. याबाबत विचारणा केल्यानंतर तू मला विचारणारी कोण, तू तुझे काम करत जा, असे म्हणत पद्मिनी यांना मानसिक त्रास दिला. तसेच पद्मिनी
यांना मुलगी झाल्यामुळे तू खानदानाला मुलगा देऊ शकत नाहीस, तू दरिद्री आहेस, असे म्हणत फिर्यादी पद्मिनी यांना त्रास दिला. तुझ्या आई-वडिलांना माझ्या मुलाविषयी काय सांगितले, असे म्हणत आरोपी सपना श्रीनिवास कोंडा व श्रीनिवास नरसिंह कोंडा (सर्व रा. विणकर वसाहत, एमाआयडीसी) यांनी फिर्यादीला मानसिक त्रास दिला. तसेच तुला माझ्या मुलासोबत नांदायचे असेल तर मुलाच्या जिम व्यवसायासाठी माहेरून ३० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सुनेचा छळ केल्याप्रकरणी वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक बागवान करीत आहेत.