सोलापूर : शेजारच्या पती-पत्नीचं भांडण सोडवायला गेलेल्या एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. पती-पत्नीचं भांडण सोडवत असताना ही महिला पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सोलापुरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने न्याय मागितला आहे.
शेजारच्या नवरा-बायकोचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नीचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला, तिच्या नवऱ्याने असा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. शेजारी राहणाऱ्या नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यांचं हे भांडण पाहून माझी पत्नी त्यांना वाचवण्यासाठी गेली होती. तेव्हा माझ्या पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला. यातच तिचा मृत्यू झाला, असं या पतीने सांगीतलं आहे.
संगिता आतिश साळुंखे (वय ३८ रा गोदूताई विडी घरकुल,सोलापूर) असं मृत पत्नीचं नाव आहे. शेजाऱ्याच्या भांडणात माझ्या पत्नीचा हकनाक बळी गेला. मला न्याय द्या, अशी आर्त हाक मृत महिलेच्या पतीने दिली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. लवकरच याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आतिश साळुंखे हे १० जानेवारी रोजी दुपारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते. ९ जानेवारीला रात्री पावणे दहाच्या सुमारास शेजारी राहत असलेले गणेश नरसप्पा कैरमकोंडा आणि त्यांच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. संगिता साळुंखे या त्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडणात संगिता साळुंखे यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्या जागेवर बेशुद्ध झाल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
संगिता साळुंखे यांना बेशुद्ध अवस्थेत ज्ञानेश्वर साळुंखे आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झालेली आहे. संगिता साळुंखे यांचे पती आतिश साळुंखे यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे