22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरशहर जिल्ह्यात अपघाती मृृृत्यू रोखण्यात यंत्रणा अपयशी

शहर जिल्ह्यात अपघाती मृृृत्यू रोखण्यात यंत्रणा अपयशी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढते अपघात आणि अपघाती मृत्यू चिंतेची बाब ठरत असून महामार्ग हे मृृृृत्युचे सापळे बनत चालले आहेत. अपघाती मृत्यू रोखण्यासाठी यंत्रणेकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असून वेगाची नशा आणी वाहतूकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष अपघाती मृृृत्युंना कारणीभूत ठरत आहे. वाहनचालकांच्या दंडाची रक्कम दुप्पट करूनही आणि दरवर्षी दीड हजार कोटींचा दंड वसूल करूनही रस्ते अपघात कमी झालेले नाहीत.

जानेवारी २०१९ पासून २२ मे २०२२ पर्यंत जिल्ह्यातील विविध मार्गांवर साडेतीन हजार अपघात झाले असून त्यात तब्बल दोन हजार जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात एकाचवेळी एकापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेले अपघात सर्वाधिक आहेत.

रस्ते अपघात होणार नाहीत, याची जबाबदारी प्रामुख्याने महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस, आरटीओ यांच्यावर आहे. त्यासाठी जिल्ह्यातील खासदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, आरटीओ आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे संचालक यांच्यासह इतर अधिका-यांची रस्ता सुरक्षा समिती आहे.

नियमानुसार प्रत्येक महिन्याला जिल्हाधिका-यांच्या समितीची तर तीन महिन्यातून एकदा खासदारांच्या समितीची बैठक व्हायला हवी. पण, मागील तीन वर्षांत त्यात सातत्य न राहिल्याने अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजनाच झालेल्या नाहीत. तर दुसरीकडे वाहनचालकांचाही बेशिस्तपणा वाढल्याचे चित्र आहे. चारचाकी आहे, पण सिटबेल्ट वापरत नाहीत, दुचाकी आहे, पण हेल्मेट घालत नाहीत. वाहनांचा अतिवेग हा देखील अपघाताचे प्रमुख कारण ठरले आहे.

तसेच अनोळखी रस्ता असतानाही अनेकजण वाहनाचा स्पिड ओलांडतात असेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे. तरीदेखील संबंधित प्रशासनाचाही कानाडोळा अपघात वाढीसाठी कारणीभूत ठरू लागला आहे. बेशिस्त वाहतूक बंद व्हावी, अपघात होऊ नयेत म्हणून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून दरमहा ५५ ते ८९ लाख रुपयांचा दंड वसूल होतो. तरीही, अनेकजण वाहतूक नियम पाळत नसल्यानेच अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

मोहोळजवळील पेनूर येथे झालेला भीषण अपघात दोन्ही वाहनांच्या अतिवेगामुळेच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्कॉर्पिओच्या चालकासह इतर कोणीही सिटबेल्ट घातला नसल्याने एअर बॅग उघडलेल्या नाहीत. त्याठिकाणी ५० फुटाचा रस्ता असतानाही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली आणि सहा जणांचा मृत्यू झाला. वाहनचालकाला गाडी आवरली नसल्यानेच हा अपघात झाल्याचे आज समोर आले. ग्रामीण वाहतूक पोलिस दलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव

यांत्याठिकाणी भेट देऊन अपघाताची कारणे शोधली. त्यावेळी ही माहिती समोर आली आहे. सोलापूर शहरातही अपघातांचे प्रमाण मोठे असून स्मार्ट सिटीच्या कामामुळे उखडलेले रस्ते अपघाती मृृृत्यूंना कारणीभूत ठरत आहेत.शहरात बेशीस्त वाहतूकीला आळा घालण्यात यंत्रणा अपयशी ठरत असून चारचाकी वाहनांचा अतीवेग मृृृत्युला आमंत्रण देणारा ठरत आहे.शहरात चारचाकी वाहनांवर कारवाई चे प्रमाण अत्यल्प असून चारचाकी वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असताना त्याला आळा घालण्यास यंत्रणा अपयशी ठरत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या