सोलापूर – भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावर देशभर मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात देखील त्याचे पडसाद उमटले आहे. सोलापुरात एमआयएम पक्षाच्या वतीने एमआयएम कार्यालयापासून ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण देशात मुस्लिम धर्मात संतापाची लाट उसळली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम देशांनी देखील याचा विरोध केला आहे. याचे पडसाद आज ( 10 ) जून रोजी सोलापुरात देखील पहायला मिळाले. एमआयएम पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली. अनेक मशिदीत जुम्माच्या नमाजनंतर म्हणजेच शुक्रवारच्या नमाज नंतर मुस्लिम समुदायाला आवाहन करण्यात आले. त्यामुळे नमाजनंतर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते. एमआयएम पक्षाचे सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं.
मोर्चात तरुणांनी भाजपा विरोधी घोषणाबाजी केली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या बॅनरला चप्पल मारून विरोधात घोषणा दिल्या गेल्या. तसेच, मोर्चाचे नेतृत्व करणारे एमआयएमचे फारूक शाब्दी हे जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आले असता पोलिसांनी मोजक्या जणांना जाण्यास सांगितले. पण, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी तरुणांना अडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले.