सोलापूर : माहेरी असलेल्या मुलीला सासरी कधी नेणार अशी विचारणा केल्याने जावयाने ‘तुमच्या मुलीला नांदवणार नाही, घटस्फोट दे’ असे म्हणत सासू आणि सासऱ्यास शिवीगाळ व लाथाबुक्यानं, बॅटने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सुनील नगर, कामगार वसाहतीमध्ये दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी गोविंद एकनाथ गायकवाड (वय ५५, रा. १६४, कामगार वसाहत भाग २, सुनील नगर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जावई शशिकांत हिरवडे (रा. कामगार वसाहत, सुनीलनगर, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची मुलगी सोनाली व तिचा पती शशिकांत हा घरी आल्यानंतर दोघे गप्पा मारत बसले होते. यावेळी फिर्यादी सासरा गोविंद गायकवाड यांनी जावई शशिकांत यास सोनालीला सासरी कधी नेणार म्हणून विचारणा केली. यावर संतापून शशिकांत याने सासरा गोविंद यांना शिवीगाळ केली. मुलीकडे पाहत तुला इथून पुढे नांदवणार नाही, मला घटस्फोट दे म्हणून दमदाटी केली. सासू व सासऱ्याला बॅटने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. यामध्ये सासऱ्याच्या पायाला व कपाळाला जखम झाली. या प्रकरणी जावई शशिकांत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार नवले करीत आहेत.