पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी भजन, कीर्तन, गोंधळ, भारुड, बँड बाजा, पोतराजा, वाघ्या मुरळी यासह विविध क्षेत्रातील पाचशेहून अधिक कलाकारांनी आपली कला सादर करीत पंढरपूर तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
देशासह राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून जत्रा, यात्रा, उत्सव बंद ठेवण्यात आल्याने यावर अवलंबून असलेल्या कलावंतांवर काही महिन्यांपासून आर्थिक संकट ओढवल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंताना न्याय मिळावा यासाठी पंढरपूर येथे विविध क्षेत्रातील कलावंतांनी आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी कलावंतांना कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी, कलावंतांच्या मुलांना चालू वर्षाची शैक्षणिक फि माफ करण्यात यावी, कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी. यासह विविध मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. यावेळी गणेश गोडबोले, रवींद्र शेवडे, प्रमोद राजहंस, प्राजक्ता बेणारे, शाहीर सुभाष गोरे, विजय व्यवहारे, मंगल दळवी, नंदकुमार पाटोळे, अजय व्यवहारे, अजय पाटोळे, प्रशांत पवार, वैभव जोशी आदींसह विविध क्षेत्रातील कलावंत उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील