Tuesday, September 26, 2023

फेर सर्व्हेक्षणामुळे वाढणार महापालिकेचे उत्पन्न

सोलापूर : शहरातील सर्वच मिळकतींचे सर्व्हेक्षण महापालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहे. आतापर्यंत सोलापूर शहरातील २० हजार ८०० मिळकतींचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून त्यात तब्बल ८१५ मिळकतदारांनी वाढीव बांधकाम, बांधकाम सुरु असल्याची माहिती लपविल्याचे समोर आले आहे.

तर ४९ मिळकती नवीन असून त्याला टॅक्स लागू नसल्याचेही उघड झाले आहे. महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींचा फेर सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी १२५ पथके तयार केली आहेत. त्यात वेगवेगळ्या विभागांमधील कर्मचारी, अधिकारी आहेत. एका पथकाला दररोज ४० घरांच्या सर्व्हेक्षणाचे टार्गेट देण्यात आले आहे.आतापर्यंत या पथकांनी २० हजार ८०० मिळकतींचे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्व्हेक्षणासंबंधित मिळकतदारांची कर नोंद आहे का, बांधकाम व वापर परवाना, ड्रेनेज कनेक्शन आहे का, पूर्वीच्या टॅक्स आकारणीनंतर बांधकाम वाढीव केले आहे का, अशी माहिती गुगल फॉर्मवर भरली जात आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे पडताळली जात आहेत.

दरम्यान, या सर्व पथकांना सर्व्हेक्षण अचूक करण्याचे बंधनकारक असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पडताळणीत काही गौडबंगाल आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वच पथकांकडून सर्व्हेक्षणाचे काम पारदर्शकपणे केले जात आहे. सोलापूर महापालिकेला ‘जीएसटी’ अनुदानासह सद्य:स्थितीत दरवर्षी ४५० कोटींचे उत्पन्न मिळते. जीएसटी अनुदान वगळून दरवर्षी महापालिकेला १८० कोटींपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या अंतर्गत दोन लाख ९३ हजार मिळकती असून त्यातून सोलापूर महापालिकेला दरवर्षी अंदाजे १५० कोटींचा टॅक्स मिळतो. पण, सर्व मिळकतींचा फेर सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात ७० कोटींपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. हद्दवाढ भागात नवीन मिळकती, नवीन व वाढीव बांधकाम झालेल्या मिळकती जास्त आढळतील,असाही अंदाज अधिकाऱ्यांना आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या