सोलापूर: सोलापूर महापालिकेने शहरातील नागरिकांकडे असलेल्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मार्च महिनाअखेर थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी कर संकलन विभागाने मागील काही दिवसांत मोठी कारवाई केली. यात १४ गाळे, २ कारखाने व १ गोडाऊन सील केला आहे. याशिवाय शहरातील ३५ नळ कनेक्शनही बंद केले आहेत.
दरम्यान, मुरारजी पेठ येथील नन्हे खान यांचा एक गाळा, उत्तर सदर बाजार येथील संजय मोटगे, प्रदीप मोटगे यांचे २ गाळे, रेल्वे लाईन परिसरातील जाहेब बोहरी यांचा एक गाळा,उत्तर कसबा येथील राजकुमार राजदेव यांचा एक गाळा असे ५ गाळे सील केले आहेत. मिळकतकर विभागाने चालू आर्थिक वर्षात दिलेल्या ५०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी केवळ १५१ कोटी रुपयेच वसूल केले आहेत .
यामुळे मार्चअखेरपर्यंत त्यांना आणखी पन्नास कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.या कारवाई मोहिमेत भवानी पेठ, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, उत्तर सदर बाजार, दक्षिण सदर बझार, विडी घरकुल, ६१ पेठ, ५८ पेठ, रेल्वेलाईन, रविवार पेठ, आदी परिसरातील १९ मिळकतदारांचे १४ गाळे, एक कार्यालय आणि नळजोड तोडण्याची कारवाई केली होती.
गुरुवारी पहिल्या दिवशी मालमत्ता कर विभागातील विशेष पथकाने सिव्हिल लाईन, ६८ पेठ, मुरारजी पेठ, रेल्वेलाईन उत्तर कसबा आदी परिसरातील १२ थकीत मिळकतदारांकडून त्यांच्या असलेल्या १० लाख २४ हजार १८५ रुपयांच्या थकबाकीपैकी ५ लाख ७२ हजार २४६ रुपयांचा कर वसूल केला.
शहरातील शासकीय कार्यालयानेही महापालिकेचा टॅक्स भरला नाही, ज्या विभागाने टॅक्स भरला नाही, त्या विभागाला महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. मार्चअखेर ही थकीत भरून महापालिकेस सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यात महसूल, रेल्वे व अन्य विभागांचा समावेश आहे. शासकीय कार्यालयाकडे लाखो रुपयाची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.