मंगळवेढा : मोबाईलमधील ड्रीम इलेवन सी या गेमधून मिळालेली एक लाखाची रक्कम चुलत भावाने न दिल्याने कुऱ्हाडीने घाव घालून सचिन सिद्धेश्वर वरकुटे या २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला. यातील आरोपी विजय नामदेव वरकुटे (वय १८ वर्षे ५ महीने) याने स्वतःहून डीवायएसपी कार्यालयात हजर होऊन खुनाची कबुली दिली आहे.
अकोला येथील वरकुटे वस्ती येथे राहणारे सचिन व विजय हे दोघे चुलत भाऊ आहेत. यातील विजय वरकुटे हा ड्रीम ईलेवन सी या गेमचा शौकीन होता. यामध्ये त्याने काही लाखांची कमाई केली होती. यातील जवळपास एक लाखाची रक्कम विजयकडून सचिनने उसनी घेतली होती. एक वर्ष होऊनही सचिन ती रक्कम विजयला देत नव्हता.
दि. २२ रोजी विजय मेंढ्यांसाठी चारा आणण्यासाठी शेताकडे कुन्हाड घेऊन गेला होता. यावेळी विजयने फोन करून सचिनला बोलवून रक्कम कधी देतो असे विचारले त्यावर मी देत नसतो, असे म्हणाला व विजयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये बघत बसला. यावेळी सचिनने हातातील कुऱ्हाडीने जोराचा घाव घातला.
पहिल्या घावात डोक्याच्या उजव्या भागाची कवटी फुटली तर दुसरा घाव गळ्यावर घातला, तो गतप्राण झाला. तत्काळ घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने हे हजर झाले. त्यावेळी उसाच्या शेतात सचिन वरकुटे याचा मृतदेह दिसून आला. मंगळवेढा पोलिसांनी सर्व प्रकारच्या शक्यतेचा विचार करून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथके तयार केली. मयताचे व संशयित व्यक्तीचे मोबाईल सीडीआर व लोकेशन मिळवून तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी स्वताहून हजर झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.