सोलापूर : मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोनाच्या विषाणूने सोलापुरात शिरकाव केला आहे. शहरात एक आणि ग्रामीणमध्ये तीन रूग्ण नव्याने आढळून आले आहेत.
शहरात दीड महिन्यानंतर एक रुग्ण आढळून आला आहे. हे रुग्ण म्हणजे एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर आहेत. शहरात एक आणि ग्रामीणमध्ये तीन रूग्ण आढळले. शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. यानंतर स्थिती नियंत्रणात आहे.
दीड महिन्यापूर्वी एक रुग्ण आढळून आला होता. हा रुग्णही चारच दिवसांत बरा झाला. खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांची आरोग्य तपासणी आणि कोरोना चाचणी झाली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे पालिकेला कळविण्यात आले.
ग्रामीण भागात शनिवार, दि. ४ जून रोजी १४५ चाचण्या झाल्या. यातून दोन पुरूष व एक महिला असे तीन रुग्ण आढळून आले. ग्रामीणमध्ये शुक्रवारी दोन रुग्ण आढळले होते. यामुळे ग्रामीण भागातील सक्रिय रुग्णांची संख्या पाच झाली असून, यात बार्शी तालुक्यात दोन, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. अक्कलकोट, करमाळा, माढा, माळशिरस, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला तालुक्यात शनिवारअखेर एकही रुग्ण नव्हता.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिका-यांना कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे आणि डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिले आहेत. तर आरोग्य केंद्रात दररोज २० ते ३० चाचण्या व्हाव्यात, असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.