सोलापूर : पालकमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर ऊर्फ भैय्या देशमुखसह सात जणांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पालकमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याबाबत आवाहन केले होते. पण भैय्या देशमुख, किशोर सुखदेव दत्तू (वय ४०, रा. दत्तू गल्ली, मंगळवेढा ), ज्ञानेश्वर शिवाजी पवार (वय ४०, रा. सोहाळे, मोहोळ), अंकुश भीमराव वाघमारे (वय ४५, रा. पानगाव, बार्शी), बजरंग कृष्णा शेंडेकर ( वय ४४, रा. वडदेगाव, मोहोळ), मोहन सुदाम दत्तू ( वय ३१, रा. कारखाना रोड, मंगळवेढा), सोमनाथ रमेश लिगाडे ( वय ३१, रा. डोणज, मंगळवेढा) यांनी जोर जोरात घोषणा देण्यास सुरुवात केली.
त्याना मज्जाव करताना त्यावेळी त्यांनी पोलिसांशी धक्काबुक्की केली. यात पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनाही हाताच्या मनगटास मुक्का मार लागल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी वरील सर्वांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास पो.स. ई. गायकवाड करत आहेत.