टेंभुर्णी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला टेंभुर्णीत सर्व व्यापारी असोशिएनच्या संघटनांनी तीव्र विरोध केला असून व्यापारी वर्गावर नाहक लॉकडाऊन लादणे अन्यायकारक असल्याचे व दोन दिवसात निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा दुकाने चालू करू असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मागण्याचे निवेदन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोनि राजकुमार केंद्रे यांनी दिले आहे.त्यात पुढे म्हटले आहे की,गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी वर्ग आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.सततच्या बंद-चालू धोरणाने व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.तसेच तो हतबल झाला आहे.त्यातच पुन्हा एक महिन्यासाठी लॉक डाऊन लागू केले आहे.या निर्णयाने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे.यामुळे निर्णयाचा सर्व व्यापारी असोशिएनच्या वतीने निषेध करण्यात आला.
बँकेचे हप्ते,दुकानाचे भाडे,कुटुंबाचे आरोग्य समस्या,घरातील जेष्ठाचे प्रश्न असे एक ना अनेक प्रश्न समोर असताना व्यापारी वर्गावर लॉकडाऊन लादने निषेधार्ह आहे.यापूर्वी शासनाने आरोग्य समस्या सोडविणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.या संदर्भात सर्व समस्यांचा विचार करण्यासाठी विविध व्यापारी संघटनांनी एकत्र बसून विचार विनिमय केला असून या लॉकडाउनला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी शासनाने लॉकडाउनच्या निर्णयाचा फेरविचार करून दोन दिवसात निर्णय मागे घ्यावा अन्यथा सर्व व्यापारी असोशिएन आपली दुकाने सर्व नियमांचे पालन करून सुरू करणार आहोत.यानंतर जी परिस्थिती उदभवेल त्यास सामोरे जाऊ असा निर्णय व्यापारी असोशिएनच्या वतीने घेण्यात आला. मागण्याचे निवेदन स्विकारून पोनि राजकुमार केंद्रे यांनी कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याने सर्वांनी संयमाने घ्यावे असा सल्ला दिला आहे.