तालुका प्रतिनिधी/ बार्शी
बार्शी तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतिच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वैरागचे सुपुत्र निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.स्थानिक जनतेने भुमकर यांना स्पष्ट बहुमत देत 17 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे तर,चार जागा भाजप (आमदार राजेंद्र राऊत) यांना मिळाल्या. तर शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्या गटाला खाते देखील उघडता आले नाही.
निवडणुक ही वैराग शहराची असली तरी चर्चा मात्र संपुर्ण तालुक्यात सुरु आहे. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी झेडपी, पंचायत समिती व बार्शी नगरपालिका निवडणुकीवर प्रत्यक्षपणे होणार असल्याने तालुक्यातील प्रमुख नेते आ. राजेंद्र राऊत व माजी आ. दिलीप सोपल व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर हे विचारपूर्वक खेळ्या खेळत आहेत. शिवसेना व कांग्रेस शेवटच्या क्षणी एकत्र आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप स्वबळावर लढले होते.
स्वत: निरंजन भूमकर आणि त्यांच्या पत्नी ही विजयी झाल्या आहेत.प्रभाग क्र.1 ते 7 व प्रभाग ,9,10,12,13,14,15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर 8,11,16 व 17 मध्ये भाजप विजयी झाले आहे. माजी आमदार चंद्रकांत ंिनबाळकर यांचे नातू शाहू ंिनबाळकर हे भाजपकडून विजयी झाले आहेत. तर त्यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद ंिनबाळकर हे पराभूत झाले आहेत. एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
वैरागची निवडणुक असली तरी या निवडणुकीचा केंद्रंिबदू हा बार्शीच आहे. राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर सोडले तर भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांची सुत्रे ही बार्शीकरांच्या ताब्यात होती. मात्र निकालानंतर खरा केंद्रंिबदू हा वैरागच होते हे सिद्ध झाले आहे. बार्शीतील प्रसिध्द उद्योजक दिलीप गांधी यांना वैरागच्या आखाड्यात उतरऊन आ. राजेंद्र राऊत यांनी मोठी खेळी केली होती मात्र त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी ही प्रचार करून बळ दिले होते.