सोलापूर – महागडी औषधे, खते, वाढलेले मजुरीचे दर पाहता लाल कांद्याला खर्चाच्या तुलनेत किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, लाल कांद्याची आवक सुरू होताच बाजारभावाला उतरती कळा लागली ती अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. सध्या तर अवघ्या आठशेच्या आसपास भाव मिळत असल्याने लाल कांदा उत्पादकांची परवड सुरूच आहे.
लाल कांद्याचे उत्पादन हे विशेषतः पाण्याची सोय नसलेल्या भागात खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याच काळात वातावरणात अनेक बदल पाहायला मिळतात. परिणामी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. आर्थिक गरजा भागवणारे दुसरे नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. या कांद्यावरच कुटुंबाची वर्षाची गुजराण, मुलांचे शैक्षणिक भविष्य, सुख-दुःखाचे कार्यक्रम अवलंबून असणारा शेतकरी लाल कांद्याला जिवापाड जपतो.
त्यातूनच बदलत्या वातावरणाचा सामना, महागडी औषधे, खते, मशागत, मजुरी यांचा खर्च वाढल्याने वर्तमानात लाल कांद्याचे एकरी उत्पादन खर्च, निव्वळ नफा व त्या नफ्यातून काढायचे विचार केला तर लाल कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळायला हवा. तेव्हाच शेतकऱ्यांना कांद्याचे पीक परवडते मात्र काद्यांची आवक सध्या सोलापूरसह राज्यातील अन्य बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आणि सध्या मिळत वर्ष असलेल्या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात आवक वाढताच बाजारभावाला उतरती कळा लागली आहे. सध्या तर एक हजाराच्या आसपास म्हणजे दहा रुपये किलोने भाव मिळत आहे. लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने काढणीपश्चात विक्री मिळेल त्या भावात करण्याशिवाय पर्याय नसतो. अशात सध्याच्या बाजारभावात शेतकऱ्याचा धड उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.असे शेतकरी प्रकाश माळी यांनी सांगीतले.