29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रपंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डॉक्टरांकडे येते तपासणीसाठी जात असत काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने ते स्वतःहून मुंबई येथे उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर ते बरे होऊन घरी परतले होते. परंतु काही दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागल्याने त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

भालके यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सायंकाळी जाहीर केले होते.शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.आमदार भालके यांच्या जाण्याने पंढरपूर-मंगळवेढा परिसरात शोककळा पसरली आहे.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे आमदार भालके यांचे मूळ गाव राजकारणात कर्मवीर कै. औदुंबरअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कामाला सुरुवात केली. कै.औदुंबरआण्णा यांनी त्यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी आणि त्यानंतर उपाध्यक्षपदी निवड केली होती. पुढे विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आली.

२००४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या वतीने लढविली त्यामध्ये त्यांना अपयश आले. परंतु त्यानंतर जोमाने मोर्चेबांधणी केली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात दंडथोपटले विशेष म्हणजे मोहिते-पाटील यांना पराभूत करून ते आमदार झाले होते. दुसऱ्या वेळी २०१४ साली त्यांनी भाजपाचे उमेदवार प्रशांत परिचारक यांचा पराभव केला होता. तर तिसऱ्यावेळी भाजपा कडून निवडणूक रिंगणात उतरलेले जेष्ठ नेते कै. सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करून आमदारकीची हॅट्रिक मिळवलेले ते आमदार होते.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राजकीय क्षेत्रात यश मिळवून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यावर वर्चस्व ठेवले होते. त्यांनी गावागावात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले होते. पांढरी टोपी, पांढरा शुभ्र पोशाख, पैलवानी शरीरयष्टी, दाढी असे त्यांचे बहारदार व्यक्तिमत्व होते. भालके यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. त्यांनी कोल्हापुरात राहून कुस्तीचे शिक्षण घेतले होते. कुस्त्यांची अनेक मैदाने त्यांनी गाजवली होती. व्यायामाचे शरीर. बोलण्याचा ग्रामीण बाज. प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे ते जिथे जातील तिथे छाप पडत असे कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेण्याची त्यांची कला वैशिष्ट्यपूर्ण होती. विठ्ठल सहकारी कारखान्याची बिघडलेली घडी पूर्ववत होण्यासाठी ते गेली दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते. आमदार भालके यांच्या जाण्याने पंढरपूर-मंगळवेढा परिसरात शोककळा पसरली आहे.

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या