22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसोलापूरपंढरीत रंगला प्रक्षाळ पूजेचा सोहळा

पंढरीत रंगला प्रक्षाळ पूजेचा सोहळा

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी गेल्या १८ दिवसांपासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाच्या प्रक्षाळ पूजेस आज सकाळी सुरुवात झाली. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीमातेला सजविण्यात आले होते. त्यांच्या या मनमोहक रुपाचे भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले. यानिमित्त आज मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. तसेच मंत्रोच्चारात प्रक्षाळ पूजेचा सोहळा पार पडला.

दरवर्षीच्या परंपरेनुसार १ जुलै रोजी देवाचा पलंग काढून घेतला जातो. त्यामुळे देव २४ तास दर्शनासाठी उभा होता. आज तब्बल १८ दिवसांनी १८ जुलै रोजी पुन्हा देवाचा पलंग बसविण्यात आला. देवाच्या प्रक्षाळ पूजेस सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी देवाचा थकवा घालवण्यासाठी अंगाला लिंबू आणि साखर चोळून गरम पाण्याने स्नान घातले. यासोबत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावरून देवाला गरम पाण्याचे मंत्रोपचारात स्नान घालण्यात आले. यानंतर देवाची महापूजा करताना देवाला दूध, गंधासह पंचामृत आणि केशर पाण्याने अभिषेक करण्यात आला. यानंतर विठ्ठल-रुक्मिणी चौखांबी, सोळखांबी येथे सुगंधी फुलांनी सजवून देवाला पारंपरिक दागिन्याने मढविण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली.

विठ्ठल चरणी ५ कोटी ७० लाखांचे दान
आषाढी वारीदरम्यान राज्यभरातून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणी अर्पण केलेली देणगी स्वरूपाची रक्कम ५ कोटी ७० लाख रुपये एवढी जमा झाली आहे. शिवाय सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजदाद अजून बाकी आहे. आषाढी पौर्णिमा झाल्यावर देवाच्या हुंडीपेट्या, देणगी केंद्रे, लाडू विक्रीसह सर्व ठिकाणच्या रकमेची मोजदाद करणे सुरू होते. आज याची आकडेवारी जाहीर करताना यंदा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांनी देवाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले.

भाविकांच्या निवासाची प्रशासनाने केली व्यवस्था
यंदा पंढरपुरात तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. त्यामुळे भाविकांच्या निवासाचा प्रश्न गंभीर होता. मात्र, प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणा-या ६५ एकर जागेवर भक्तिसागर निवास क्षेत्र विकसित केले. तसेच यंदा रेल्वेच्या ताब्यातील ४० एकर क्षेत्र प्रशासनाला मिळाले. त्यामुळे १०५ एकर जागेत तब्बल ५ लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या