27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरसोलापुरात चोर झाले पोलिसांवर मोर!

सोलापुरात चोर झाले पोलिसांवर मोर!

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापुरात दागिने चोरी, घरफोड्या वाढल्या असून सोन्याच्या वाढत्या किमती पाहता चोरांकडून दागिन्यांवर डल्ला मारला जात आहे. जुळे सोलापुरातील वामन नगर येथील एका घरातून दहा तोळे दागिन्यांची चोरी झाली असून, गेल्या पाच महिन्यांत शहराच्या विविध भागांतून तब्बल ३०० तोळ््यांहून अधिक वजनाच्या सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. किरकोळ घटनांची तर गणतीच नाही. दुसरीकडे, यातील बहुतांश घटनांचा तपास लागू शकलेला नाही, हे विशेष.

शहरात दररोज मोटारसायकल चोरी, घरफोडी, चोरी, दुचाकी व चारचाकी वाहने पळवणे, लॅपटॉप, मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, पोलिस तपास कुर्मगतीने होत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

तीन महिन्यांपूर्वी हैदराबाद रस्त्यावरील मंत्री- चांडक आंगन परिसरातील खान चाचा आणि त्यांच्या शेजारील धिम्मसवार यांच्या घरातून ८० तोळे, बांधकाम व्यावसायिक सुनील कोंडा यांच्या घरातून ५५ तोळे आणि मुख्याध्यापिका लक्ष्मी कंदीकटला यांच्या घरातून ३२ तोळे असे चार ठिकाणी मिळून किमान दोनशे तोळे दागिने चोरीला गेले. या घटनांचा अद्यापही तपास लागलेला नाही.

जुळे सोलापूर वामन नगर परिसरातील एका घरातून अडीच लाखांचे दागिने चोरीला गेले. ही बाब घरच्यांना पाच महिन्यांनी दागिने घेण्यासाठी गेल्यावर ध्यानात आली. पल्लवी उदय कुलकर्णी यांनी विजापूर नाका पोलिसांत रविवारी फिर्याद दिली. २९ जानेवारी रोजी घरातील कपाटात दहा तोळे विविध दागिने (किंमत अंदाजे २ लाख ४० हजार २३६ रुपये) सोन्याच्या पाटल्या आणि बांगड्या ठेवल्या. लॉक करून चावी कपाटाखालच्या बाजूला ड्रॉवरमध्ये ठेवली. यानंतर मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात जाण्यासाठी २८ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दागिने घेण्यासाठी कपाट लॉकर उघडले तेव्हा दागिने दिसले नाहीत. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दागिने चोरीसाठी उच्च मध्यमवर्गीय व सधन परिसराला लक्ष्य केले जात असून, घरात मोठ्या प्रमाणावर सोने ठेवणे लोकांच्या अंगलट येत असल्याचे दिसून येते. वाहन चोरीचे प्रमाणही मोठे असून पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असूनही चोर पोलिसांवर मोर होत असल्याचे चित्र आहे.

सातही पोलिस ठाण्यांचे डीबी पथक गुन्हे शाखेचे पथक, पोलिस आयुक्तांचे भरारी पथक चो-यांच्या तपासाकडे लक्ष देत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी मोटारसायकल चोरांची टोळी, मंगळसूत्र चोरांची टोळी, किरकोळ स्वरूपातील काही चो-यांचा तपास पोलिसांनी केला. मात्र अनेक मोठ्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही. विशेषत: एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या चोरीच्या घटना आहेत. पोलिस अद्याप तपास सुरू असल्याचे सांगतात. पोलिस तपास संथ गतीने होत असल्याने चोरांचा आत्मविश्वास वाढल्याचे या घटनांवरून दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या