22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeसोलापूरसोलापूरात पोलिसांनी रोखला बालविवाह

सोलापूरात पोलिसांनी रोखला बालविवाह

एकमत ऑनलाईन

सोलापूर : हळदीनंतर दुसऱ्या दिवशी विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. अक्षता टाकायला काही मिनिटांचाच अवधी होता. नवरा शेरवानी घालून तर नवरी शालू घालून नटली होती. त्याचवेळी मंडपात पोलिस आले आणि नवरी मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात गेले.

वऱ्हाडी मंडळीला काहीच समजले नाही. काहीवेळाने स्पीकरवरून एकाने सांगितले, काही कारणामुळे विवाह होणार नाही. मुलीचे वय १६ वर्षे असतानाही तिचा विवाह लावला जात असल्याने एमआयडीसी पोलिसांनी चाकोते नगरातील लक्ष्मी मंदिरात होणारा बालविवाह नुकताच रोखला.

मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ होण्यापूर्वी विवाह करता येत नाही, असा कायदा आहे. तरीपण, मुलगी आठवी-नववी किंवा दहावी-अकरावीत शिकत असतानाच तिचे शिक्षण अर्ध्यावरच थांबवून विवाह लावून देण्याचे प्रकार वाढले आहेत. मुलीला चांगला पती मिळतोय, विवाहाचा खर्च कमी होईल, मुलगी शिकून कलेक्टर होणार आहे काय, पुन्हा असा नवरा तिला मिळणार नाही, जमाना खराब आहे, महिला-मुलींवरील अत्याचार वाढले आहेत, मुली पळून जाण्याचेही प्रमाण वाढले आहे, अशा मानसिकतेतून मुलींचे कमी वयात विवाह लावले जात असल्याची स्थिती आहे.

एमआयडीसी पोलिसांनी रोखलेल्या दोन्ही बालविवाहावेळी पोलिसांना हाच अनुभव आला. कोणालाही खबर लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत जुना विडी घरकूल परिसरातील चाकोते नगरातील मुलीच्या कुटुंबाने घेतली होती. विवाहापूर्वी हळदी समारंभ पार पडला. दुसऱ्या दिवशी आता विवाहाची सर्व तयारी झाली. मुलीच्या नात्यातील नवऱ्याकडील वऱ्हाडी विवाहाला वाहने करून आली होती. पण, विवाहाला काही मिनिटांचाच अवधी शिल्लक असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैजिनाथ कुकडे यांच्या पथकाने तो बालविवाह रोखला. चार दिवसांपूर्वी पण एमआयडीसी पोलिसांनी अंबिका मंगल कार्यालयात होणारा बालविवाह रोखला होता.

अक्कलकोट रोडवरील अंबिका मंगल कार्यालयात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह २२ वर्षीय तरूणासोबत लावला जात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब एमआयडीसी पोलिसांना त्याठिकाणी जावून वस्तुस्थिती पाहून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक वैजिनाथ कुकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी मुलीचे वय १६ असल्याचे आधारकार्डवरून लक्षात आले आणि पोलिसांनी नवरीला पोलिस ठाण्यात नेऊन पुढे बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून मंगल कार्यालयासह दोन्हीकडील आई-वडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच चोरून विवाह केला आणि मुलगी अल्पवयीन असल्यास त्या नवरा मुलावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या