सोलापूर : मारामारी, दमदाटी, गौण खनिज चोरी करणारा सराईत गुन्हेगार रवी प्रकाश निकम (वय ३५, रा. दक्षिण कसबा) याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. निकम याला सोलापूर शहर व जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. याबाबत पोलिसांनी नुकतेच आदेश दिले आहेत.
आगामी काळात विविध जातीधर्माचे सण, उत्सव मिरवणुका निघणार आहेत. शिवाय महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात अप्रीय घटना घडू नये यासाठी शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने रवी निकम याला तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका व फौजदार चावडी पोलिस स्टेशन हद्दीत मारामारी, दमदाटी, गौण खनिज चोरी अशा प्रकारचे विविध गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त परिमंडळ यांनी दिले.
त्यास शनिवार ४ मार्च २०२३ पासून विजापूर नाका पोलिस स्टेशनकडून ताब्यात घेऊन, सोलापूर शहर व जिल्हा उस्मानाबाद जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले.