सोलापूर : कोरोना काळ आणि संपानंतर एसटी ची चाके पुन्हा गतीमान झाली असून पुन्हा एकदा नव्या उत्साहाने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे एसटीचे अर्थकारण हळूहळू रूळावर येत आहे. कर्मचा-यांचा संप आणि रेल्वेतून प्रवास करण्यातील सर्वसामान्यांच्या अडचणींमुळे अनेकांनी खासगी वाहतुकीचा अनुभव घेतला. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अतिवेग, प्रवास भाडे खूपच, या बाबींचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी आता वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपानंतर एकाच महिन्यात (२२ एप्रिल ते २२ मे) लालपरीने अंदाजित ४७२ कोटी रुपये कमावले असून दररोज जवळपास ३१ लाख प्रवासी लालपरीने प्रवास करीत आहेत.
दरमहा नियमित वेतन, पगारवाढीवरून सुरु झालेले आंदोलन पुढे महामंडळाच्या विलिनीकरणावर अडले. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून हा संप मिटविला, पण हा संप एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांपर्यंत राहिला. त्या काळात प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रत्येक १५ ते ३० मिनिटाला धावणारी लालपरी बस स्थानकात उभी होती. त्यावेळी गावातून शहरात घेऊन जाणा-यांना लालपरीच्या खडतर प्रवासाचा अंदाज आला.
उन्हाळा असो की पावसाळ्यातही अडथळ्यांची शर्यत पार करीत बसचे चालक, वाहक प्रवाशांना सुरक्षित पोहचवतात, याची जाणीव संप काळात प्रवाशांना झाली. वर्षानुवर्षे सेवा देणा-या लालपरीने पैसे कधी कमावलेच नाहीत, ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरच लालपरीने प्रवाशांची सेवा केली. त्यामुळेच आता प्रवाशांची संख्या वाढू लागली असून दररोज ३१ लाखांहून अधिक ३२ लाखांपर्यंत प्रवासी लालपरीतून प्रवास करीत आहेत. त्यातून लालपरीला दररोज सुमारे १८ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. पण, त्यात इंधनाचाही खर्च आहे.
एसटी कर्मचा-यांना नियमित वेळेवर वेतन मिळावे, यासाठी पुढील चार वर्षे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व कर्मचा-यांचे वेतन केले जाणार आहे. कर्मचा-यांच्या मेहनतीमुळे सध्या प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. ती रक्कम बसस्थानक सुधारणांसह प्रवासी वाढीसाठी वापरली जाईल.असे राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
सध्या १५,३०० बस मार्गावर धावत असून
दररोजचे उत्पन्न १८ कोटी आहे. दररोज ३१लाख प्रवासी प्रवास करत असून २२ एप्रिलनंतर
४७२ कोटी रूपयांची कमाई एसटीने केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना दरमहा वेळेवर वेतन मिळावे, यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचा-यांना राज्य सरकार वेतन देणार आहे. दरवर्षी तीन हजार ६०० कोटीप्रमाणे सरकारला एसटी कर्मचा-यांच्या वेतनासाठी १४ हजार ४०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. लालपरीने कमावलेली रक्कम बस स्थानके सुधारणा, वायफाय सेवा यासह प्रवासी वाढीच्या दृष्टीने नियोजित कामांवर खर्च केली जाणार आहे.