सोलापूर : शहराजवळ असलेल्या केगाव येथे पालिकेच्यावतीने इको पार्क उभारण्यात येत असून पहिल्या टप्प्याचे काम मेअखेर पूर्ण होईल, असे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.
शहरातील एसटी स्थानकापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केगावनजीक ४७ एकर जागेवर पिकनिक पॉईंट म्हणजेच इको पार्क विकसित केला जात आहे. या ठिकाणी डीपीडीसीतून १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारकिर्दीत मंजूर झाला होता. या निधीतून विविध कामे पूर्णत्वाच्या मार्गावरच आहेत. सायकल ट्रॅकचे काम सध्या पूर्ण झाले आहे. या इको पार्कमध्ये (पिकनिक स्पॉट) मंजूर निधीतून पहिल्या टप्प्यात सायकल ट्रॅक, गझिबो, रॉक गार्डन, इंटरन्स प्लाझा, रॉ गार्डन, प्रसाधनगृह, ओपन गार्डन आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
यश कन्स्ट्रक्शन यांच्याकडे या कामाचा मक्ता देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे, अशी माहितीही कारंजे यांनी दिली. या संपूर्ण ४७ एकरावरील मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. कंपाउंड वॉल, तारेचे कुंपणही करण्यात येत आहे. दरम्यान, विस्तीर्ण अशा ४७ एकरावर आतापर्यंत सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे सहा फुटाच्या वरपर्यंत वाढली आहेत. हिरवाईने नटलेला हा परिसर आता सर्वांना आल्हादायक असा ठरणार आहे, असेही कारंजे यांनी सांगितले.