करकंब : औषध विक्री परवाना रद्द केला असतानादेखील पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ओंकार कृषी केंद्रामधून औषधांची व खतांची विक्री केल्याप्रकरणी दुकानमालक व त्यांचा मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दुकानमालक संजय राजाराम पवार व त्यांचा मुलगा ओंकार यांच्यावर ३ लाख ३१ हजार ४७३ रुपयांची औषधे चोरीस गेल्याचा गुन्हा पंढरपूर तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी दाखल केला आहे. ओंकार कृषी केंद्रातून करकंब व बार्डी गावातील आठ शेतकऱ्यांनी द्राक्ष फवारणीसाठी तणनाशक खरेदी केली होती. मात्र सदर तणनाशक फवारल्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले.
याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे ओंकार कृषी केंद्राची व सदर तणनाशकाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या प्रकरणी सदर कृषी केंद्र सीलबंद करण्यात आले होते. दरम्यान, १४ जानेवारी रोजी येथील अमर व्यवहारे, बबन दुधाळ व रियाज कोरबू यांनी तालुका कृषी अधिकारी सरडे यांना ओंकार कृषी केंद्राचे सील काढून माल नसल्याची माहिती दिली. सदर माल दुकानाच्या मालकांनी चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी पंचासह पाहणी केली असता दुकान व गोदामामध्ये १९ कंपन्यांचे औषध नसल्याचे आढळून आले. यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी करकंब पोलिस ठाण्यात पवार पिता- पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.