सोलापूर : जिल्ह्यातील महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढली असून मुंबई, पुण्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात नवउद्योगांना मोठा वाव आहे. अक्कलकोट रोड ‘एमआयडीसी’तील जागा उद्योगांनी व्यापली असून चिंचोली ‘एमआयडीसी’तील जागा देखील संपली आहे. तेथे आता विस्तारासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे मंद्रूप व पंढरपूर (कासेगाव) ‘एमआयडीसी’चा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयाकडून महाव्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे. वर्षभरात भूसंपादन सुरू होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातून सध्या सोलापूर- विजयपूर, सोलापूर- अक्कलकोट मार्गे पुढे कर्नाटक, सोलापूर- तुळजापूर (येडशी), सोलापूर- पुणे, सोलापूर- सांगली, सोलापूर- हैदराबाद हे मार्ग गेले आहेत. आता सुरत- चेन्नई महामार्ग प्रस्तावित असून त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही लवकरच सुरू होईल. सोलापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्ग देखील होणार आहे. आगामी काळात विमानसेवा देखील सुरू होईल. त्यामुळे भविष्यात सोलापूर जिल्ह्यात नवउद्योजकांना वाव असेल, असे ‘एमआयडीसी’चे अधिकारी सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विशेषत: आपल्या विधानसभा मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांची आर्थिक प्रगती होईल, या हेतूने पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विधान परिषदेचे आमदार रणजितंिसह मोहिते- पाटील यांनी पंढरपूर एमआयडीसीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे.
दुसरीकडे, मंद्रूप येथे एमआयडीसी व्हावी, यासाठी माजी मंत्री दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे आगामी वर्षभरात दोन्ही एमआयडीसीचा विषय मार्गी लागू शकतो.
सोलापूर जिल्ह्यातून सध्या सहा महामार्ग कनेक्ट झाले असून, आणखी एक महामार्ग (सुरत- चेन्नई) होत आहे. तसेच सोलापूर- उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग देखील होणार आहे. दरम्यान, महामार्ग होऊनही अनेक वाहने शहरातूनच जातात.
शहरातून जाणारी जड वाहतूक कायमची बंद व्हावी आणि जड वाहनांच्या सोयीसाठी आता शहराच्या बाहेरून ६० किलोमीटरचा रिंगरोड होणार आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावे त्याला जोडली जातील. त्याचाही फायदा उद्योजकांना होणार आहे. जागेच्या मोजणीचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने भूमी अभिलेख कार्यालयाला दिले आहे.
मोजणीनंतर गावे निश्चित होतील आणि त्यानंतर भूसंपादन होईल, असे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. पंढरपूरजवळील कासेगाव तर मंद्रूप येथील जागा एमआयडीसींसाठी निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादनाच्या दृष्टीने दोन्ही एमआयडीसींचा प्रस्ताव सांगली प्रादेशिक कार्यालयाने भूसंपादन विभागाच्या महाव्यवस्थापकांना पाठविला आहे. आता भू-निवड समितीकडून जागेची पाहणी होईल. त्यानंतर उच्चाधिकार समिती व मंत्रिस्तरावर बैठका होतील. ले-आउट अंतिम होऊन हायपॉवर कमिटी त्यावर अंतिम निर्णय घेईल. शेवटी त्यावेळचा रेडिरेकनर व खरेदी-विक्रीचा दर विचारात घेऊन ज्यांची जागा संपादित होईल, त्यांना मोबदला दिला जाणार आहे. दोन्ही ठिकाणी किमान एक हजार छोटे-मोठे उद्योग सुरू होतील, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.