सांगोला : साक्षीदार फितूर झाला, फिर्याद द्यायला उशीर झाला, मात्र गुन्ह्यात आरोपीला खोटेपणाने गुंतवलेले नाही आणि पीडितेची साक्ष महत्त्वाची मानत विवाहितेवर अत्याचार केल्या प्रकरणात सांगोला तालुक्यातील नवनाथ बेहरे यास दोषी धरून पंढरपूरचे सत्र न्या. एन. के. मोरे यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावला.
आरोपी नवनाथ बेहरे याने छावणीतून घरी परत येत असलेल्या विवाहितेवर सन २०१३ मध्ये अंधारात तोंड दाबून अत्याचार केला. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास पतीसह पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बेहरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात घटनास्थळ पंचनामा साक्षीदार फितूर झाला होता. मात्र पीडित
महिलेची साक्ष ही अत्यंत महत्त्वाची असून तिच्या साक्षीवर आरोपीस शिक्षा होऊ शकते, तसेच फिर्यादीस झालेल्या विलंबाबाबत तिने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच तिची वैद्यकीय तपासणी झाली नसली तरी घटना घडून तीन महिने झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय तपासणी झाली नसली तरीही झालेल्या पुरावा मिळून येणार नाही. केवळ वैद्यकीय तपासणी झाली नाही म्हणून घटना घडलीच नाही व आरोपीस अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात खोटेपणाने गुंतविण्याचे कारण नाही. तसे वैमनस्यदेखील नाही.
घटनास्थळी आरोपीचा मोबाइल मिळाला. या सर्व परिस्थितीत साक्षीदारांनी एकमेकांना पूरक अशी साक्ष दिली आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. त्याकरिता सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे सादर केले. ही घटना पीडितेच्या संमतीने घडलेली आहे. तर ती सज्ञान आहे. वैद्यकीय तपासणी झाली नाही, फिर्याद देण्यास विलंब झाल्यामुळे घटना संशयास्पद असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
सरकारतर्फे या प्रकणात एकूण चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या न्यायालयासमोर आलेले एकंदरीत पुरावे व दोषारोप पत्रातील कागदपत्रांचे अवलोकन करून सत्र न्या. एन. के. मोरे यांनी आरोपी नवनाथ बेहरे यास दोषी धरत सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. सारंग वांगीकर व के. पी. बेंडकर यांनी काम पाहिले, कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बनकर, पोलीस कॉन्स्टेबल राजू माने यांनी मदत केली.