सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त नंदीध्वज मिरवणूक काढण्यात येते. यासाठी विविध राज्यातून लाखो भाविक शहरात येत असतात. त्या अनुषंगाने सिद्धेश्वर मंदिर व परिसरात भाविकांची गर्दी होत असते. यामुळे वाहनांच्या रहदारीमुळे भाविकांना अडथळा व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी १३ ते १७ जानेवारीदरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. विजापूर वेस ते पंचकट्टापर्यंत येण्याचा मार्ग बंद असणार आहे.
या कालावधीत अत्यावश्यक सेवेची वाहने व पोलिसांकडून ज्या वाहनांना परवानगी असेल अशीच वाहनांना मार्गावर प्रवेश असेल. शिवाय हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज मार्गस्त झाल्यावर नंदीध्वज जसे जसे पुढे जाईल तसे त्या त्या मार्गावर वाहतूक वळविण्यात येईल असे आदेश पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी काढले आहेत.
रेवणसिद्ध मंदिराच्या आवारात जनावर बाजारासाठी परवानगी देण्यात येते त्या परिसरातही नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच श्री सद्धेश्वर मंदिर परिसर, मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा या परिसरातही नो पार्किंग झोन असणार आहे. हे आदेश १३ ते १७ जानेवारीपर्यंत लागू राहतील.
विजापूर वेस ते पंचकट्टा जाणा-यांना विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकी मार्गे जावे लागणार आहे. लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा जाणा-यांना विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकी मार्गे, भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पंचकट्टा जाणा-यांना पूनम चौक ते बेगमपेठ पोलिस चौक मार्गे, भारतीय स्टेट बँक ते ट्रेझरी शाखा ते पार्क चौक जाणा-यांसाठी पूनम चौक रंगभवन चौक सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक डफरीन चौक पार्क चौक मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. याशिवाय मार्केट पोलिस चौकी ते पंचकट्टा, पार्क चौक ते मार्केट पोलिस चौकी, ज्ञानप्रबोधनी प्रशाला ते फडकुले सभागृह हे रस्ते रहदारीसाठी बंद असणार आहेत.