22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरसिध्देश्वर येत्या हंगामात इथेनॉल प्रकल्प सुरू करणार : काडादी

सिध्देश्वर येत्या हंगामात इथेनॉल प्रकल्प सुरू करणार : काडादी

एकमत ऑनलाईन

सोलापूर (प्रतिनिधी) : कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना २०२२-२३ या गळीत हंगामामध्ये राज्यातील अन्य कारखान्यांप्रमाणेच अत्याधुनिक इथेनॉल प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केली.

गुरुवारी, कारखान्याच्या २०२१-२२ या गळीत हंगामाची यशस्वी सांगता उद्योगपती प्रेमरतन दमाणी, वळसंग सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी काडादी यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे व या हंगामातील शेवटच्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी दमाणी यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त काडादी यांनी त्यांचा सत्कार केला. कारखान्यासह शहरातील प्रश्न दमाणी यांच्या सहकार्याने सोडवू, असे काडादी म्हणाले.

काडादी म्हणाले, गाळप हंगाम सुरू करताना कारखान्यासमोर अनेक अडचणी होत्या. विमानतळाच्या नावावरती चिमणीचा प्रश्न उभा केला गेला. या परिस्थितीत जानेवारीपर्यंत अतिशय कष्टप्रद दिवस गेले. कारखाना बंद व्हावा, यासाठी पर्यावरण व वीज वितरण कंपनीमार्फत नोटिसा देऊन त्रास देण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेतकरी सभासद, अधिकारी आणि कामगारांनी एकजुटीने कारखाना बंद पाडण्याची प्रक्रिया थांबविली. या घडामोडींचा कोणताही परिणाम होऊ न देता हंगाम यशस्वी केला, याबद्दल त्यांनी कामगारांंचे अभिनंदन केले.

गाळप हंगामाच्या वेळी उसाला २५०० रुपयांचा दर जाहीर केला. आज आपली एफआरपी त्याच्या जवळ पोहोचली आहे. २०१३-१४ मध्ये संकल्प केल्यानुसार आज कारखाना, सहवीजनिर्मिती आणि मिलमध्ये स्वयंचलित अत्याधुनिकपणा आला आहे. प्रगत तंत्रज्ञानावरील चांगल्या पद्धतीचा कारखाना उभा करू शकलो. १३ लाख २४ हजार ७५८ मे. टन ऊस गाळपाचा उच्चांक केला आणि १३ लाख १६ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन करून कारखान्याने नावलौकिक मिळविला आहे. वीज निर्मिती प्रकल्प सुरू केल्यापासून दुष्काळ व उसाच्या कमतरतेमुळे तो पूर्ण क्षमतेने चालू शकला नाही. यंदा सर्व अडचणींवर मात करून १६ कोटी ४७ लाख ३७ हजार ६७२ युनिट विजेचे उत्पादन झाले. त्यापैकी १२ कोटी ७ लाख ३१ हजार १०० युनिट वीज निर्यात केली. राज्यात वीज निर्मिती आणि निर्यातीमध्ये कारखान्याने प्रथम क्रमांक पटकाविला. येणारा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारी करून वाढीव क्षमतेसह ऊस गाळप करण्यासाठीची सज्जता ठेवावी, असे काडादी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या