22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसोलापूरसोलापूरात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

सोलापूरात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरात महापालिकेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या ५८ शाळा असून, त्याअंतर्गत साडेपाच हजार विद्यार्थी आहेत. दुसरीकडे, खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्येही जवळपास ५५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही कोरोनाची भीती झुगारून शहरातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ९८ टक्के उपस्थिती आहे.

मार्च २०२० रोजी बंद झालेल्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा तब्बल दोन वर्षांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये उघडल्या. बहुतेक मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. कोरोनातील निर्बंधांमुळे पालकांनाही दररोज कामानिमित्त बाहेर जावे लागत होते.
त्यामुळे ती मुले अक्षर ओळखीपासून, पाढे व वाचनात मागे राहिली. आता त्या मुलांवर फोकस करीत शिक्षक त्यांच्या क्षमता विकसित करीत आहेत. त्यासाठी सेतू अभ्यासाचीही मदत घेतली जात आहे.

मागील इयत्तेतील बेसिक व चालू वर्षाचा अभ्यासक्रम आता एकत्रितपणे शिकवावा लागत आहे. त्यासाठी शाळांनी दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांची पूर्वचाचणी घेतली आहे. शाळा सुरू झाल्यापासून आठ दिवसांत ती चाचणी घेणे अपेक्षित होते. तर पुढील २० दिवसांत उत्तर चाचणी घ्यावी लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, अंकगणित येते की नाही, याची पडताळणी उत्तर चाचणीतून होणार आहे.

शाळांमधील उपस्थिती चांगली असल्याने त्या मुलांच्या सेतू चाचण्या घेतल्या जात आहेत. आगामी काळात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांना सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. वेळप्रसंगी अभ्यासात मागे राहिलेल्या मुलांसाठी शिक्षकांना ज्यादा तासही घ्यावे लागणार आहेत

. तशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्वांना दिल्या आहेत.ग्रामीणच्या तुलनेत शहरात कोरोनाचे रुग्ण सध्या अधिक आहेत. सध्या शहरात १२५ पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. बहुतेक रुग्णांना प्रतिबंधित लसीकरणामुळे तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांच्याच घरी ते उपचार घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या