24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeसोलापूरसोलापूरकरांना जाणवतेय शिंदे व मोहिते-पाटील यांची कमतरता

सोलापूरकरांना जाणवतेय शिंदे व मोहिते-पाटील यांची कमतरता

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन आदींची प्रचंड कमतरता आहे. प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करते आहे मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लॉकडाऊनमुळे अर्थचक्र विसकटले असतानाच लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च करायचा कसा असा प्रश्न कोरोनाबाधितांना पडला आहे. पालकमंत्री इंदापुरातून अधून मधून येऊन बैठका घेतात आणि प्रशासनाला सूचना देतात. दत्तात्रय भरणे हे तिसरे पालकमंत्री आहेत.

या आधी जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील हे औटघटकेचे पालकमंत्री सोलापूरला मिळाले. कोरोनाकाळात लोकप्रतिनिधी फारसे सक्रिय नाहीत. काही लोकप्रतिनिधींनी व्हेंटीलेटर, ऑक्सिजन आदी सुविधांसाठी निधी दिला आहे मात्र लोकांच्या अडीअडचणी संपताना दिसत नाहीत. प्रशासकीय अधिकारी शासनाच्या आदेशाप्रमाणे काम करत आहेत मात्र कोरोनाच्या कराल दाढेत शहर जिल्ह्यातील जनता भरडली जात आहे.

गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून शहर जिल्ह्याचे अर्थचक्र कोलमडले आहे. कोरोना नियंत्रमासाठी तात्कालिक उपाययोजना प्रशासकीय पातळीवरून केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या आहेत. अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी ज्या ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत त्या होताना दिसत नाहीत. नागपूर शहराला रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी थेट कारखानदारांशी संपर्क साधून नागपूरकरांना इंजेक्शन उपलब्ध करून दिली वर्ध्यानजीक रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा उत्पादन प्रकल्प उभारला. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना उत्पादन क्षमता वाढवून दिली.

मिनी व्हेंटीलेटरचा पुरवठा रुग्णालयांना केला. देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरकरांना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय केली, वैद्यकीय सुविधांसाठी निधी दिला. नागपूरसाठी दोन्ही नेते आपापल्या पातळीवर प्रयत्नशील आहेत. मात्र सोलापुरात काय चित्र आहे. या शहराला जिल्ह्याला कोणी वालीच उरला नाही, अशी स्थिती आहे.

काही काळापूर्वी सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे दोन नेते सोलापूर शहर जिल्ह्याचे नेतृत्व करायचे. सोलापूर शहरातील प्रश्नांसाठी शिंदे आणि जिल्ह्यातील प्रश्नांसाठी मोहिते पाटील आपापल्या परीने कार्यरत राहायचे. २००२ ची दंगल पालकमंत्री म्हणून मोहिते पाटील यांनी सक्षमपणे हाताळली. सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा प्रत्येक संकटात सोलापूरला तारले आहे. अगदी खासदार नसतानाही काही वर्षांपूर्वी विजापूर रस्त्यावरील झोपडपट्टी रेल्वेच्या जागेत असल्याने रेल्वे विभागाने पाडण्याचा निर्णय घेतला होता.तेव्हा तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्कसाधून शिंदे यांनी गोरगरीबांची घरे वाचवली होती.

कालांतराने सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे दोन्ही नेते सत्तेच्या वर्तुळाबाहेर गेले मात्र त्यांच्या तोडीचा एकही नेता सध्या नसल्याने कोरोनाकाळात सोलापूरकरांना त्यांची पोकळी जाणवत आहे. सोलापूरची मदार प्रशासकीय अधिका-यांवर असून धडाडीने निर्णय घेणारे शिंदे आणि मोहिते पाटील यांची कमतरता सामान्य सोलापूरकरांना प्रकर्षाने जाणवते आहे.

नांदेड विभागातून १५० वी किसान रेल्वे रवाना; आजपर्यंत ४७,९५७ टन कांदा, टरबूज व द्राक्षांची वाहतूक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या