दमाणीनगर येथे राहणा-या सुप्रिया गणेश मोरे यांनी पती गणेश मोरे यांच्या निधनानंतर रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवला. त्यासाठी रिक्षा चालवायला शिकल्याने आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून विद्यार्थी वाहतूक व्यवसायात यश मिळविले. त्यांचे शिक्षण बारावी इतके झाले असून सहावीला मुलगा तर तिसरीला मुलगी शिकते आहे. पतीच्या अचानक निधनानंतर सुप्रिया मोरे यांनी खचता विद्यार्थी वाहतूक सुरू केली आणि या व्यवसायातून घरखर्च चालवून रिक्षावर असलेले कर्जही त्या फेडतात. व्यवसाय बंधूंचे सहकार्य काम करत असताना मिळत असल्याचे त्या सांगतात.
सासूबाई, वडील, मामा आदी नातेवाईकांचे मार्गदर्शन व पाठिंबा असल्यामुळे विद्यार्थी वाहतूक व्यवसायात जम बसवता आल्याचे त्यांनी सांगितले. जगण्याच्या संघर्षातून व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्षच केल्यामुळे आत्मविश्वास वाढला. त्याचा फायदा व्यवसाय करताना झाला. मुलगी सेवासदन, तर मुलगा सरस्वती शाळेत शिकतो. मुलांना मोठी करण्याची व चांगले शिक्षण देण्याची जिद्द असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांच्या चुकीच्या वार्तांकनामुळे कुटुंब झाले उद्ध्वस्त
पती गणेश मोरे यांच्या मारुती व्हॅनमध्ये स्फोट झाला. या घटनेचे वार्तांकन प्रसारमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने केले. त्यामुळे पती गणेश यांना मानसिक धक्का बसला. मेंदूत ताप गेल्यामुळे त्यांचे निधन झाले. यामुळे आमचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले. याचा विचार प्रसारमाध्यमांनी केला पाहिजे. एकतर्फी वार्तांकनामुळे एखाद्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. माणूस आयुष्यातून उठतो. माझे तर कुंकूच गेले, अशी भावना सुप्रिया मोरे यांनी बोलून दाखविली.
परिस्थितीपुढे न खचता केली मात
२०१८ साली पती गणेश मोरे यांच्या निधनानंतर सुप्रिया यांनी समर्थपणे कुटुंबाचा गाडा सांभाळला. आणि सासूबाई व मुलांची जबाबदारी त्या नेटाने पार पाडत आहेत. परिस्थितीपुढे न खचता त्यांनी त्यावर मात केली.
सुप्रिया गणेश मोरे
रिक्षा चालक
ऑनलाईन वस्तू विक्री व्यवसायातून मिळवली ओळख – किर्ती धनेश देशपांडे