प्रतिनिधी/मोहोळ
बारामती लोकसभा मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे उजनीचे पाणी पळविण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आता आम्ही सर्वपक्षीय पदाधिकारी रस्त्यांवरील व न्यायालयीन लढ़ाई आरपार लढणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते व यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक नागेश व्हनकळसे यांनी मोहोळ येथे मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्गावरील रास्तारोको च्या दरम्यान केले.
याबाबतची माहिती अशी की मागच्याच वर्षी सोलापूरातील जनतेने तीव्र विरोध केल्याने रद्द केलेली उपसा सिंचन योजना पुन्हा लाकडी ंिनबोणी या नावाने पुन्हा आणली आहे. आपलेच बारामती लोकसभा क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पुढे सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे उजनीचे पाणी पळवण्याचा डाव रचला आहे. यामुळे मोहोळ तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे नेते दादा पवार, राष्ट्रवादीचे महेश पवार, काँग्रेसचे मोहोळ शहराध्यक्ष किशोर पवार यांनी आपल्या मनोगतात सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि सर्व साखर कारखानदार मूग गिळून गप्प बसण्यापेक्षा आता पुढे येऊन आपल्या जिल्हावरील होत असलेल्या अन्यायाविरोधात सर्वसामान्या बरोबर रस्त्यावर उतरावे असे मत व्यक्त केले. अॅड श्रीरंग लाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, युवासेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश शिवपुजे, माजी पं.स. सदस्य महादेव गोडसे, अविनाश क्षीरसागर, विद्यार्थी सेनेचे हर्षल देशमुख, सरपंच केशव वाघचवरे, नानासाहेब सावंत, अमर चव्हाण, शिवाजी पासले, गणेश गावडे, बंडू मुळे, बिरुदेव देवकते, देवानंद सोनटक्के, आशिष आगलावे, दतात्रय पासले, रघुनाथ झांबरे, दिनेश क्षीरसागर, साईनाथ लोमटे, माजी सरपंच प्रकाश पारवे, विक्रम भोसले, पोपट मुळे आदींसह पन्नास ते साठ कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांना त्यांच्या सहका-यांसोबत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.