सांगोला : भरधाव टमटम पलटी होऊन दहावीची परीक्षा देण्यापूर्वीच कडलासमधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ता पसरताच शाळेसह गावावर शोककळा पसरली.
दत्तात्रय बिरुदेव भजनावळे ( वय १६, रा. कडलास, ता. सांगोला) असे अपघातात मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, हा अपघात सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास कडलास सांगोला रस्त्यावर येताळ बाबा जवळ घडला. या अपघातानंतर मृत दत्तात्रयाचे वडील बिरुदेव तुकाराम भजनावळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
दत्तात्रयच्या पश्चात आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील ऊस तोड मजुरी करून गुजराण करतात. त्याच्या मृत्यूची वार्ता येताच आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. मृत दत्तात्रय भजनावळे हा कडलास बहुउद्देशीय प्रशालेत इयत्ता दहावीत
शिकत होता. सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास दत्तात्रय भजनावळे हा आत्याचा मुलगा अप्पासाहेब शहाजी ऐवळे यांच्या टमटममध्ये बसून कडलासहून सांगोल्याकडे निघाला होता. वाटेत येताळ बाबा जवळ भरधाव टमटम पलटी झाल्याने दत्तात्रय गंभीर जखमी झाला.
अपघात घडता माजी नगरसेवक सतीश सावंत व शुभम पाटील, वडील बिरुदेव भजनावळे यांनी त्याला उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढी ल उपचाराकरिता पंढरपूर येथे घेऊन जात असताना वाटेत उपचारापूर्वी मृत्यू झाला.