सोलापूर : रेल्वे स्टेशन परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करताना तक्रारदाराच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी रेल्वे स्टेशन पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर (वय ३४) याने त्यांना मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले आणि पोलिस चौकीतच लाचेची रक्कम स्वीकारताना क्षीरसागर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
घटनेची हकीकत अशी, सदर बझार पोलिस ठाण्याअंतर्गत रेल्वे स्टेशन पोलिस चौकीचा कारभार पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांच्याकडे होता. रेल्वेतून उतरल्यानंतर अनेक प्रवासी खासगी वाहनांनी घरी जातात. त्याठिकाणी खासगी वाहनांची मोठी गर्दी असते. अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर तथा वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई केली जाते.
ही कारवाई टाळण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे दरमहा १३ हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. तक्रारदार, त्याचा भाऊ व त्याच्या दोन मित्रांची खासगी वाहने आहेत. त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून तडजोड करून १२ हजार रुपये दरमहा देण्याचे निश्चित झाले. पहिलाच हप्ता घेताना पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पोलिस चौकीतच लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, प्रमोद पकाले, उमेश पवार, शाम सुरवसे यांच्या पथकाने केली. मागील चार महिन्यात सदर बझार पोलिस ठाण्याअंतर्गत ही दुसरी कारवाई आहे.