सोलापूर : कारखान्याच्या आवारातच मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी (अक्कलकोट रोड) येथील ताटी कारखाना येथे बुधवारी (ता. १५ जून) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
प्रवीणकुमार विठ्ठल गंजी (वय ३० रा. जुना कुंभारी नाका) असे मयत झालेल्या कारखानदारांचे नाव आहे. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह कारखान्यातील छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन खाली पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला.
यासंबंधी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रवीणकुमार गंजी हा एमआयडीसी येथील ईआरटी चौकाजवळ असलेला ताटी यांचा कारखाना (लुम) भाड्याने चालवण्यासाठी घेतला होता. बुधवारी सुट्टी असल्याने कारखाना बंद होता. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरातील लोकांनी कारखान्यात जाऊन पाहणी केली असता, त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खाली जमिनीवर पडलेल्या आढळून आला.
याची माहिती मिळताच एमआयडीसीच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालकडे पाठवून दिला. मयत प्रवीणकुमार हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजले नाही.हवालदार बागवान पूढील तपास करीत आहेत.