24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरतीन वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या

तीन वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मोहोळ : नागपंचमीच्या सणाला जाऊ दिले नाही या धुसफुसीतून पती-पत्नीत थोडीशी कुरबुर झाली. नाराज झालेल्या पत्नीने भावाला फोन करून सांगितले. त्यामुळे रागाला गेलेला पती भावाला फोन का केला म्हणून पुन्हा पत्नीशी भांडला. निराश झालेल्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. तीन वर्षांच्या मुलीसह स्वत:ला गळफास लावून घेऊन आत्महत्या करत जीवन संपवले.

ही हृदयद्रावक घटना कोरवली (ता. मोहोळ) येथे सोमवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. प्रीती विजयकुमार माळगोंडे (२५) तर आरोही विजयकुमार माळगोंडे (३) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. याबाबत कामती पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती माळगोंडेचे पाच वर्षांपूर्वी कोरवली येथील विजयकुमार माळगोंडेबरोबर लग्न झाले होते. विजयकुमार हा शेतकरी असून सहा जर्सी गायी, एक म्हैस व दोन बैल असा बारदाना सांभाळत आहे. लग्नानंतर दांपत्य त्यांच्या शेतातील घरात राहत होते. त्यांना मुलगी आरोही (मयत) व मुलगा बसवराज अशी दोन गोजिरवाणी मुले झाली.

त्यांचा संसार सुखाचा चाललेला असतानाच दीड वर्षापूर्वी दृष्ट लागली. पती विजयकुमार हा पत्नी प्रीतीस मारहाण करीत होता. दरम्यान, श्रावण महिना असल्याने या दांपत्याने सोमवारी सकाळी १० वाजता गावातील महादेव मंदिरात येऊन अभिषेक घातला होता. सोमवारी दुपारी पती विजयकुमार याने मेहुणा मल्लिनाथला फोन का केला म्हणून तिला चाबूक व चपलेने मारून धमकी दिली होती. त्यानंतर तो जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेला. जाताना तो
फराळ घेऊन ये म्हणून सांगून गेला. मात्र तीने पतीच्या त्रासाला कंटाळून मुलगी आरोही हिला प्रथम नंतर स्वत: घरामध्ये पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. दरम्यान मुलगा बसवराज हा पाळण्यात झोपल्याने तो सुखरूप राहिला. पती विजयकुमार हा दुपारी घरी आल्यानंतर जनावरे बांधून वैरण टाकून पत्नी प्रीती हिला हाक मारत घरात गेला तर त्याला समोरच पत्नी व मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

मयताचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरुळे (रा. हत्तूर, ता दक्षिण सोलापूर) यांनी कामती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, य घटनेची माहिती समजताच कामत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांन घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्याने मयत माय-लेकींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा संघर्ष होण्याच्या शक्यतेने कामती पोलिसांनी स्मशानभूमीत पोलिस बंदोबस्त लावला होता. मायलेकीला एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने सर्व नातेवाईक व कोरवली परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. अंत्यसंस्कारानंतर लगेचच पती विजयकुमार माळगोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या