सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी कांद्याची विक्रमी उलाढाल दाखवून कांदा अनुदान योजनेत कोट्यवधी रुपयांची बोगसगिरी करण्याच्या तयारी सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. बाजार समितीमध्ये गेल्या महिनाभरात कांद्याचे शे-पाचशे ट्रक दाखल झाले. परंतु, व्यापारीकडील कांदा खरेदीच्या नोंदी पाहता दररोज ८०० ते १ हजार ट्रक दाखल झाल्याचे सांगण्यात येते आहे. बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनी व्यापार्यांवर कारवाईचा इशारा दिला.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समितीमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री करणान्या शेतकऱ्यांना ३४० प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विटल अनुदान मिळणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीच्या बोगस नोंदी सुरू केल्याचा संशय आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी ३०० ते ४०० गाड्या कांदा येतो. मात्र, मार्च महिन्यात दररोज ८०० ते १ हजार गाड्या कांदा दाखल झाल्याच्या नोंदी केल्याचे काही व्यापार्यांनी सांगितले.
बाजार समितीमध्ये ८०० पेक्षा अधिक ट्रक कांदा आला तर हैदराबाद रोड परिसरात वाहनांची रांग लागते. मागील वर्षी १ हजार ट्रक कांदा आल्यानंतर बाजार समितीला व्यवहार ठप्प ठेवावे लागले होते. पोलिस वाहतूक यंत्रणेची दमछाक झाली होती. बाजार समितीमध्ये बुधवार, २९ मार्च रोजी २३५२ ट्रक कांदा आल्याची नोंद आहे. तरीही बाजार समितीमधील व्यापार्यांचे व्यवहार सुरळीत सुरु होते, मग एवढ्या गाड्या गेल्या कुठे?, असा सवाल उपस्थित होत आहे.
कांदा अनुदानामुळे बंगळुरू, हैदराबाद येथील मार्केटमध्ये जाणारा कांदा सोलापुरात दाखल होत आहे. काही व्यापारी काटा खरेदीच्या बोगस नोंदी करीत असल्याचे कानावर आले आहे. सचिवांना दप्तर तपासणीची सक्त ताकीद दिली आहे. नियमानुसार कामकाज न करणे, बोगस नोंदी करणारे व्यापारी आढळले तर आम्ही परवाने रद्द करू.असे बाजार समिती.सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगीतले.
या प्रकरणाची चौकशी करायची झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतील. यंत्रणेला तपासणी करणे शक्य होणार नाही, हे ओळखून कांदा अनुदानाचा घोटाळा करण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.