सोलापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संलग्न विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी व इंटर्नशिप करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दाखल झाले आहेत. सामंजस्य करारांतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन हे दहा भावी डॉक्टर दोन आठवडे शिक्षण घेणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी शैक्षणिक साहचर्य करार केलेला आहे. त्याअंतर्गत सोमवारी आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित वैद्यकीय, आयुर्वेदिक, डेंटल महाविद्यालातील एकूण दहा विद्यार्थी आंतरवासिता कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून रुजू झाले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते झाले.
यावेळी समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, आरोग्य विज्ञान संकुलातील प्रा. डॉ. मनाली काणे तसेच संगणकशास्त्र संकुलातील प्रा. चंद्रकांत गार्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, वैद्यकीय विद्यार्थ्यांनी वैद्यकशास्र शिकत असतानाच आरोग्याशी निगडीत इतर गोष्टींचेदेखील शिक्षण घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्याकरता त्यांनी उन्हाळी आंतरवासिता कार्यक्रमाचा चांगला वापर करून घ्यावा. नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासोबतच इतर विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या आंतरवासिता कार्यक्रमाचे शैक्षणिक क्रेडिट्स मिळून त्याचा त्यांच्या पुढील करिअरमध्ये चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो, अशी माहिती डॉ. फडणवीस यांनी दिली. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सदर उन्हाळी आंतरवासिता कार्यक्रमाकडून विविध अपेक्षा व्यक्त केल्या. हा कार्यक्रम दि. २३ मे ते ४ जून असे दोन आठवडे चालणार आहे. यावेळी प्रा.सुजय घोरपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
असा राहणार कार्यक्रम
आंतरवासिता कार्यक्रमात विद्यार्थ्याना न्युट्रिशन व बायोस्टाटीस्टिक्स या विषयांसोबत व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य तसेच करिअरच्या संधी, ताण तणाव व्यवस्थापन आदी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे या भावी डॉक्टरांसाठी ग्रामीण रुगणालय तसेच वडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे क्षेत्र भेटींचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ.अभिजित जगताप यांनी दिली.
दिल्लीसह महाराष्ट्रातील विद्यार्थी
दोन आठवडे चालणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात इंटर्नशिप कार्यक्रमासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दिल्लीसह महाराष्ट्राच्या विविध भागातील दहा विद्यार्थी दाखल झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना सोलापूर विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती तसेच भावी डॉक्टरांना आवश्यक असलेल्या विविध प्रशिक्षणाची ही सोय सोलापूर विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे.