सोलापूर : मुंबई ते सोलापूरसाठी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची घोषणा झाली असून, ही गाडी मार्च २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वे विभागाने सोलापूर ते मुंबई रेल्वेमार्गाची चाचणी केली आहे. वंदे भारत गाडीचा वेग साधारण १३०च्या पुढे असणार आहे. सध्या आहे त्या ट्रॅकची गतिक्षमता वाढविल्याशिवाय वंदे भारत सुरू करता येणार नाही. त्यामुळे सोलापूर ते मुंबई रेल्वे रुळाची क्षमता वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनूसार सोलापूर रेल्वे प्रशासन वंदे भारत एक्स्प्रेससाठी तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई ते पुणे या मार्गाची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. दुस-या टप्प्यात दौंड ते वाडी या साडेतीनशे किलोमीटर रेल्वे रुळांवर काम सुरू आहे. या मार्गावरील सर्व रुळांची क्षमता आता प्रति तास १३० किमीने वाढणार आहे.
सध्या या मार्गावरील सर्व रेल्वे रूळ व गाड्यांची क्षमता प्रति तास ११० किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे सर्व गाड्या ९० ते १०० किलोमीटर वेगाने धावतात. सोलापूर ते पुणे जाणा-या गाड्या चार ते सव्वाचार तासांत पुण्याला पोहोचतात. रुळाची क्षमता वाढल्यानंतर अवघ्या तीन तासांत पुण्याला पोहोचता येईल. पुणे ते मुंबई या मार्गावरदेखील रेल्वे रुळांची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईला अवघ्या चार ते पाच तासांत पोहोचता येईल.