सोलापूर : मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करीत पुणे, नाशिक येथे राहण्यास असलेला अपहरण प्रकरणातील आरोपी अखेर वैतागल्यामुळे गावाकडे आला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी यशस्वी सापळा रचून संबंधित आरोपीस सहा तासांत पकडले. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली.
दरम्यान, पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, लग्नाचे आमिष दाखवून २४ जून २०२१ रोजी एकाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. त्याबाबतचा गुन्हा टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून गुन्ह्यातील पीडित बालिका व आरोपी यांचा टेंभुर्णी पोलिस ठाणे पोलिसांना शोध लागला नाही. शेवटी टेंभुर्णी पोलिसांनी १० मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केला. या गुन्ह्याचा अनैतिक मानवी कक्षाने तपास सुरू केला. अवघ्या सहा तासांत गावातील घरातून पीडित बालिका व संबंधित आरोपीस अरण (ता. माढा) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी टेंभुर्णी पोलिसांच्या स्वाधीन केले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपास आल्यानंतर संबंधित कक्षाचे अधिकाऱ्यांनी तपासासाठी पथके तैनात केली. गोपनीय माहिती मिळाली. मोबाईल ट्रेसिंग करण्यात आला. त्यानंतर सापळा रचून अवघ्या सहा तासात संबंधित आरोपी व पिडीत बालिकेस पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रभारी पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलिस निरीक्षक गायकवाड, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सविता कोकणे, पोहवा सचिन वाकडे, लक्ष्मण राठोड, प्रिती पाटील यांनी उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी केली. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.