मोहोळ: तालुक्यातून जाणा-या पेनूर परिसरातील उजनीच्या डाव्या कालव्यात मंगळवार, दि. १४ जून रोजी पेनुर गावच्या हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह कॅनॉलमधील पाईपला अडकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे तो मृतदेह तसाच पुढे वाहत गेला असून, मोहोळ पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मृतदेह नेमका कोणाचा, याबाबत तो मृतदेह हाती आल्यानंतरच समजू शकणार आहे. पोलिसांनी जाळी टाकून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला खरा; पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो तसाच पुढे वाहून गेला आहे.
पोलिसांच्या माध्यमातून शोध घेण्याचे काम सुरू असून पेनुरपासून पुढे सौंदणे, वडवळ परिसरातील शेतक-यांना याबाबत माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले आहे.
मृतदेह असलेल्या व्यक्तीचे वय ४0 ते ४५ च्या दरम्यान असून, त्याच्या अंगावर पांढरा शर्ट व पांढरी विजार आहे.